महाआघाडी सरकारचा विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय सुरूच

May 22,2020

नागपूर, 22 मे - जेव्हा जेव्हा या राज्यात बिगर भाजपाचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सापत्र वागणूक मिळाली आहे. यावेळीही काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाआघाडीसरकारने पुन्हा विदर्भ  आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करीत कृषी पंपांच्या कनेक्शनसाठी विदर्भ व मराठवाडा वगळून अन्य महाराष्ट्रातील 2800 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकताच 18 मे रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या 2800 कोटीतून 2542 कोटी रुपये एचव्हीडीएस प्रणालीद्वारे वीज कनेक्शन आणि 105 नवीन उपकेंद्रांसाठी 257 कोटी रुपयांच्या कर्जासाठी शासनाने हमी
घेतली आहे. हे कर्ज महावितरण घेणार आहे. यापैकी एकही कनेक्शन आणि एकही उपकेंद्र विदर्भ आणि मराठवाड्यात होणार नाही, पुन्हा या भागातील शेतकरी हा उपेक्षित ठेवला जाणार आहे. वर्ष 2014 नंतर राज्यात आलेल्या बारतीय  जनता पक्षाच्या सरकारने ऊर्जा क्षेत्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला. या सोबतच या दोन्ही क्षेत्रातील उद्योगांनाही सवलत देऊन त्यांनाही स्थिर करण्याचा प्रयत्न केला. ऊर्जा विभागाने आणलेल्या प्रत्येक  योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना देण्यात आला. पण राज्यात आता राज्यात आलेल्या बिगर भाजपा सरकारने पुन्हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यंचा अनुशेष वाढविण्याचा प्रकार सुरू केला आहे असा आरोप बावनकुळे यांनी  केला.