केंद्र सरकार देते महाराष्ट्राला सापत्न वागणूक अ‍ॅड. यशोमती ठाकूर

May 22,2020

मुंबई, 22 मे - कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून मात्र त्याकडे सातत्यने दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात केेंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक  पॅकेजमध्ये ही राज्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असून मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सापत्रभावाची वागणूक दिली जात असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. यशोमती  ठाकूर यांनी केला आहे. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा कुटिल डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असा निर्धारही ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार यासह अनेक खासगी बँकांनी तसेच कॉर्पोरेट  कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. अनेक औद्योगिक वसाहती मुंबई व परिसरात आहेत. नामांकित उद्योगसमूहांच्या मालकांचे निवासस्थानही मुंबईत आहे. बॉलिवूडचे मुख्य केंद्रही मुंबईत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुंबईचे महत्त्व  अन्यसाधारण आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल मुंबईत होऊन त्याचे महसुली उत्पन्न केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होत असते. असे असताना सध्या कोरोनाग्रस्त असलेल्या मुंबईकडे मात्र केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले  असल्याचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधनी नाही. देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत सध्या कोरोनाने कहर केला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने देशाच्या या आर्थिक राजधानीकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकारने साफ निराशा केली आहे. 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये मुंबईसाठी विशेष तरतूद असेल, अशी आमची अपेक्षा होती. तीही केेंद्राने फोल ठरवली. मुंबई  जगली तर महाराष्ट्र जगणार आहे आणि महाराष्ट्र जगला तर हा देश जगणार परंतु केंद्राने या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे.