भररस्त्यातच रुग्णाने सोडला प्राण

May 21,2020

ठाणे, 21 मे - कोरोनामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रुग्णाला भर रस्त्यातच मृत्यूला कवटाळावे लागले आहे. या रुग्णासाठी रुग्णवाहिका मागविण्यांत आली होती. पण अ‍ॅम्ब्ल्यन्स चालकाकडे पीपीई किट नसल्याने तो या रुग्णाला हात  लावण्यास कचरत होता. तीच स्थिती तेथे उपस्थित सुमारे शंभर नागरिकांची होती. अखेर शेकडो जणांच्या डोळ्यादेखत या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाने रस्त्यावरच प्राण सोडले. काळीज पिळवटून टाकणार्‍या या घटनेनंतर उपस्थितांच्या  हाती हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीही नव्हते.

वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर येथे रहाणार्‍या 60 वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर काल या रुग्णाला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलीने त्यांना कळबा रुग्णालयात नेले. मात्र जागा नसल्याचे सांगतानाच तापाचा रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे कारणही यावेळी देण्यात आले. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पण तेथेही जोपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत दाखल  करून घेतले जात नसल्याचे सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अधिक त्रास होऊ गला. त्यानंतर या मुलीने स्थानिक माजी नगरसेवकाला सांगून रुग्णवाहिका मागविली.  रुग्णवाहिकाही चारच्या सुमारास परिसरात दाखल झाली. मात्र त्याच दरम्यान रुग्णाचा अहवाल घेऊन त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रुग्णवाहिका घेऊन येणार्‍या चालकासोबत पीपिीई किट घातलेला कोणीही व्यक्ती  नसल्याने या रुग्णाला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसवून नेणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यामुळे रुग्णवाहिका येऊनही रुग्णाला रुग्णालयात नेता आले नाही. परिणामी त्याने तिथेच प्राण सोडला.