नाशिककर सराफांनी घडवला नवा कोरोना फ्रेन्डली दागिना

May 21,2020

नाशिक, 21 मे - कोरोनाच्या संकटकाळाची चर्चा न करता सप्तपदी चालविणार्‍या नववधू-वरांसाठी खूशखबर आहे. लग्नगाठ बांधताना साधासुधा नव्हे तर चक्क चांदीचा मास्क परिधान करता येणार आहे. नाशिकमधील सराफ कारागिरांनी उत्कृष्ट कारागिरी करीत चांदीचे मास्क तयार केले असून, त्याला अल्पावधीत चांगली मागणी असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.

नाशिकची कलाकुसरीची चांदीची भांडी प्रसिद्ध आहेत. नाशिकमधील चांदीच्या भांड्यांची व उपकरणांसाठी वापरण्यात येणार्‍या चांदीची शुद्धता ही देशात अव्वल आहे. त्यामुळे येथील चांदीच्या भांड्यांना भारतात खूप मागणी असते.  कलाकुसरीची कामेदेखील नाशिकमधील कारागीर अत्यंत सुबक पद्धतीने करतात. कोरोनाच्या संकटामुळे लग्न अतिशय साध्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे वाचलेला पैसा वधू- वर मंडळी दागिन्यांवर खर्च करताना दिसून येत आहेत. हिंदू  संस्कृतीत आपल्या आप्तेष्टांना सणासुदीला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. सध्या कोरोनाचे संकट असले तरी खास वधूृ-वरांसाठी येथील कारागिरांनी चांदीचे मास्क तयार केले आहेत. चांदीत असलेल्या निर्जंतुकीकरण या गुणधर्मामुळे  कोरोनाचा फैलाव रोखण्यात त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. नाशिकमधील अनेक सराफ व्यावसायिकांकडे चांदीच्या मास्कच्या ऑडर्स बुक झाल्या आहेत.