चंद्रपूर विद्युत उपकेंद्रात लागली आग

May 21,2020

चंद्रपूर, 21 मे - चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी मार्गावर असलेल्या म.रा. विद्युत महापारेषण कंपनी मर्यादित 400/220 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी आग लागल्याची घटना घडली. नप अग्निशामक दलाच्या वाहनाने अनेक फेर्‍या मारून आग  विझवण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

वरोडा-करंजी मार्गावर महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे 440/220 के.व्ही. उपकेंद्र स्थापित करण्यात आले असून तेथूनच महाराष्ट्रातील इतर शहरात विद्युत पुरवठा केला जातो. वाढत्या तापमानामुळे अनेक छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडत असतात. जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. अशावेळी उपकेेंद्रात आगीचा भडका होताच परिसरातील कर्मचार्‍यांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. धुराचा लोट पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी वरोडा नगर परिषदेच्या अग्निशमनविभागाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले होते. वेळप्रसंगी जीएमआर कंपनीच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी परिसरात  आगीने विळखा घातला. विद्युत पुरवठा संबंधात ही कंपनी अग्रेसर असली तरी परिसरात देखभालीसाठी वरिष्ठांकडून काम दिलेल्या संबंधित ठेकेदाराकडून निष्काळजीपणा केल्या जात असल्याचे कळते त्याचा प्रत्यक्ष या आगीच्या  निमित्ताने दिसून आला. या विद्यूत केेंद्रात सर्वत्र सुका कचरा दिसून येतो. कचर्‍याचे निवारण करण्यासाठी कुठलीही पावले संबंधितांकडून उचलली गेली नसल्याने केंद्राला आगीचा सामना करावा लागला. अशी जनतेत चर्चा आहे. आगीचे  कारण स्पष्ट होऊ शकले नाही.