लॉकडाऊन आणि मी - कोरोनाची इष्टापत्ती- भारताला जागतिक महासत्ता बनण्याची संधी डॉ. प्रफुल्ल मोकदम

May 21,2020

लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आवश्यक होते का असा प्रश्‍न अनेकजण उपस्थित करतात. मात्र वैेद्यकीय व्यावसायिक आणि अभ्यासक या नात्याने मी सांगू शकतो की, कोरोनाच्या साथीत लॉकडाऊन हा अत्यंत आवश्यक होता. भारतात पंतप्रधान मोदींनी योग्यवेळी योग्य निर्णय घेत कोरोनाविरुद्धचा लढा सुरु केला आणि सर्वच स्तरातील प्रशासन आणि लोकांनीही योग्य साथ दिल्याने 130 कोटीच्या देशात आपण इतर देशांच्या तुलनेत या रोगाचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलो असा दावा मध्यभारतातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ. प्रफुल्ल मोकदम यांनी केला आहे.

नागपूर इन्फोच्या लॉकडाऊन आणि मी या स्तंभात डॉ. मोकदम आपली मते मांडत होते. नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना डॉ. मोकदम म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन, इटली, जपान असे भारताच्या तुलनेत असलेले प्रगत देश बघितल्यास त्याठिकाणी भारताच्या तुलनेत रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली आणि रोगाने बाधित मृत्युंचे प्रमाणही अधिक  होते. त्या तुलनेत भारतात रुग्णसंख्या आणि मृत्यू दोन्हीचे प्रमाण खूप कमी राहिले. आपल्याकडे बाधित रुग्ण उपचारानंतर सुधारून घरी जाण्याची संख्या तुलनात्मकरित्या अधिक आहे याकडे डॉ. मोकदम यांनी लक्ष वेधले.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रभाव बघता कोणते तरी कडक पाऊल उचलायला हवे असे मला वाटत होते. त्यानुसार लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा मानसिक दृष्ट्या आम्ही तयारीतच होतो. आमचे रामदासपेठेतील क्लिनिक  आणि नर्सिंगहोम आम्ही काही दिवस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सर्व स्टाफलाही सुटी दिली होती. मात्र नंतर 1 एप्रिलपासून रुग्णालय सुरु करायची परवानगी मिळाली तेव्हा आम्ही रुग्णालय पुन्हा सुरु केले. माझे वय आता 70 च्या  दरम्यान आहे. त्यामुळे मी नर्सिंगहोममध्ये जायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र नेत्रतज्ज्ञ असलेली माझी दोन्ही मुले क्लिनिग आणि नर्सिंगहोम सांभाळतात. आम्ही ऑपरेशन्स सध्या बंदच ठेवलेली आहेत. मात्र तपासणीसाठी येणार्‍या  रुग्णाच्या बाबतही आम्ही कठोर नियम लावले असून ते कटाक्षाने पाळले जातात. हॉस्पिटलमध्ये एका वेळी एकच रुग्ण आत सोडायचा आणि आत आल्यावर डॉक्टरांनी सुरक्षित अंतरावरूनच तपासणी आणि चर्चा करायची हे आम्ही  ठरवलेले आहे. त्यानुसारच रुग्णांना तपासणे सुरु आहे.

मी क्लिनिकमध्ये जात नसल्यामुळे सध्या दिवसभर घरीच आहे. इतर सामाजिक अ‍ॅक्टिव्हिटिजही बंद आहेत. त्यामुळे मोबाइलच्या माध्यमातूनच सर्वांशी संपर्क ठेवणे सुरु आहे. मी दररोज जिम्नॅशियममध्ये जात असे. मात्र लॉकडाऊनमुळे  तेही बंद झाले. त्यामुळे सध्या मी घर आणि हॉस्पिटल यांच्या आवारात दररोज सकाळी साधारणतः 3 किलोमीटर वॉक करतो. त्यानंतर व्यायाम आणि मग आंघोळ, पूजा आणि नाश्ता असा कार्यक्रम असतो. घरी दोन नातवंडंही आहेत.  त्यांच्याबरोबर पत्ते, कॅरम असे खेळ आम्ही उभयता खेळतो. त्यात वेळही बरा जातो आणि नातवंडांना वेळ दिल्याचे समाधानही मिळते.

खरेतर मधल्या काळातील व्यस्त जिवनामुळे कुटुंबासाठी सलग वेळही दिला जात नव्हता. कोरोनाचा तो एक फायदा झाला आहे. या निमित्ताने कुटुंबामध्ये बॉन्डिंग चांगले झाले आहे. मधल्या अनेक वर्षात आम्ही एकत्र जेवणे हा एक योगच असायचा. आता मात्र मुला सुनेबरोबर आमचे रोजचे जेवण चालते. यातून एक वेगळाच आनंद मिळतो आहे.

सध्या विज्ञानाने जबरदस्त प्रगती केली आहे. त्याच्या विविध फायद्यांमधला एक म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदततीने आमच्या मेडिकल फिल्डमध्ये बरेच बेबीनार्स या काळात झाले. त्यातले अनेक बेबीनार्स  मी निवांत वेळ असल्यामुळे अटेंडही केले. त्यामुळे नवनवे संशोधन, आमच्या क्षेत्रातील नवनवे प्रयोग याचीही माहिती मिळाली. लॉकडाऊनचा हाही एक फायदाच होता. मराठी नाटक हा माझा विकपाँईंट आहे. मधल्या काळात सभागृहात  जाऊन नाटके बघायला वेळच नव्हता. माझ्या एका मित्राने मला 40 नाटकांच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या. त्यामुळे या 40 नाटकांचा आनंदही आम्ही लुटला. याशिवाय टिव्हीवर यूट्यूबच्या माध्यमातून बरेच चित्रपटही बघता आले. हा  लॉकडाऊनचा माझ्या दृष्टीने बोनस होता. गाण्याची माझी जुनीच आवड आहे. गाण्याचा मी क्लासही लावला होता. मात्र नियमित जाणे होत नव्हते. आता मात्र मी घरीच हामिेनियम घेऊन गाण्याचा शक्य तेवढा रियाजही करतो.

कोरोना ही जागतिक महामारी आहे असे म्हटले जाते. मात्र भारतापुरते बोलायचे झाल्यास कोरोना ही माझ्या मते एक इष्टापत्ती आहे. कोरोनावर प्रतिबंधक औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरु आहे. माझ्या अंदाजानुसार सप्टेंबर 2020  पर्यंत कोरोनासाठी प्रतिबंधक औषध आलेले असेल. हे प्रतिबंधक औषध आणि जिवनशैलीतील काही बदल यांच्या मदतीने आम्ही कोरोना फ्रेन्डली आयुष्य सहज जगू शकतो. कोरोनाने जागतिक स्तरावर मंदी येणार हे निश्‍चित. मात्र यावेळी भारतातील तरुणाई पुढे आली तर नवे उद्योग इथे विकसित होऊ शकतील आणि जगाच्या तुलनेत भारताला फारसा आर्थिक फटका बसणार नाही आणि लवकरच भारत जागतिक महासत्ता बनू शकेल असा विश्‍वास व्यक्त करीत डॉ.  मोकदम यांनी हा संवाद आटोपता घेतला.

-अविनाश पाठक