अविनाश पाठक लिखित आठवणीतले नेते या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती प्रकाशित..

May 21,2020

नागपूर २१ मे :  ज्येष्ठ मराठी पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आणि भरारी प्रकाशन मुंबई द्वारे प्रकाशित 'आठवणीतले नेते या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती आज प्रकाशित झाली असून हे वाचनीय पुस्तक आता अँमेझॉन किंडलवर आजपासून उपलब्ध झाले आहे. आठवणीतले नेते ची ही ई आवृत्ती भरारी प्रकाशनानेच प्रकाशित केली असून ही या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे.

विशेष म्हणजे आज २१ मे हा लेखक अविनाश पाठक यांचा जन्मदिवस असून आज वयाची ६५ वर्षे पूर्ण करित ते ६६ व्या वर्षांत पदार्पण करित आहेत. आज अविनाश पाठक यांच्या पुस्तकाची ई आवृत्ती प्रकाशित करुन आम्ही त्यांना वाढदिवसाची भेट देत असल्याची भावना भरारी प्रकाशनच्या संचालिका सौ. लता गुठे यांनी व्यक्त केली आहे...

नांदेडच्या दै. श्रमिक एकजूट मध्ये अविनाश पाठक यांची नेत्यांमधला माणूस ही लेखमालिका दीर्घकाळ चालली होती. या लेखमालिकेतील निवडक लेख आठवणीतले नेते या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. राजकीय नेते हे तुमच्या आमच्यासारखेच असल्याचे सांगत या नेत्यांमध्ये पाठकांना दिसलेली माणुसकी या लेखांमधून त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांच्या ४५ वर्षांच्या पत्रकारितेत त्यांच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांच्या आठवणी या पुस्तकात त्यांनी शब्दबध्द केल्या आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते उल्हासदादा पवार यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून या पुस्तकात स्व. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, दिग्विजय खानविलकर, इंदिरा गांधी ,डॉ ए पी जे अब्दुल कलाम, सरसंघचालक सुदर्शनजी, बनवारीलालजी पुरोहित, दत्ता मेघे, नितीन गडकरी अशा सुमारे ३० नेत्यांच्या आठवणी संकलित केल्या आहेत. ६ डिसेंबर २०१८ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून साहित्य विहार या संस्थेच्या २०१९ च्या उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

गत ४५ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या अविनाश पाठक यांचा प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडीया आणि सोशल मिडीया असा सर्वत्र लिलया संचार राहिला असून महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. याशिवाय रामटेकच्या गडावरून या नियतकालिकाचे दहा वर्षे त्यांनी संपादन केले आहे. 

अविनाश पाठक यांची आतापर्यंत एकुण दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात मराठी वाङमय व्यवहार- चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही कादंबरी, डावपेच हा राजकीय कथासंग्रह, काळ्या कोळशाची काळी कहाणी हे कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश आणि आठवणीतले नेते हे ललित लेखसंग्रह , तसेच दाहक वास्तव, मागोवा घटितांचा आणि कालप्रवाहाच्या वळणांवरून या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय थोडे आंबट थोडे गोड हा ललित लेखसंग्रह आणि दृष्टीक्षेप ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. 

विशेष म्हणजे अविनाश पाठक यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली असली तरी त्यांच्या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती प्रकाशित ही पहिलीच वेळ आहे.

सध्या अविनाश पाठक हे दै पुढारी, दै. नवशक्ति, दै श्रमिक एकजूट, दै. बित्तंबातमी इत्यादी वृत्तपत्रांमध्ये नियमीत लेखन करित असून नागपूर इन्फो डॉट कॉम या न्यूज पोर्टलचे सल्लागार संपादक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीबद्दल त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे...