लॉकडाऊन आणि मी - गत चार वर्षात थांबलेल्या संगीत रियाझाचा नव्याने आनंद लुटता आला - डॉ. तनूजा नाफडे

May 20,2020

लॉकडाऊन आणि मी

गत चार वर्षात थांबलेल्या संगीत रियाझाचा नव्याने आनंद लुटता आला लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी गेली जवळजवळ चार वर्षे ही माझ्या आयुष्यातील अत्यंत व्यस्ततेची होती. या काळात भारतीय लष्करासाठी भारतीय सुरावटीची मार्शल  ट्यून बांधून देण्याचे शिवधनुष्य मला पेलावे लागले. त्यामुळे माझा मूळ पाया असलेल्या संगीताच्या रियाझाकडे माझे प्रचंड दुर्लक्ष झाले होते. मात्र लॉकडाऊनमुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत गत दोन महिन्यांमध्ये मी भरपूर वेळ देत मनसोक्त रियाझाचा आनंद लुटला असल्याचे मनोगत नागपुरातील ज्येष्ठ संगीतकार आणि धरमपेठ महाविद्यालयातील संगीताच्या विभागप्रमुख डॉ. तनूजा नाफडे यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन आणि मी या नागपूर इन्फोच्या विशेष स्तंभासाठी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. तनूजा नाफडे बोलत होत्या. नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी त्यांना बोलते केले.

डॉ. नाफडे यांनी भारतीय लष्कारासाठी संपूर्ण भारतीय सुरावटीची शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन शंखनाद ही पहिली भारतीय मार्शल ट्यून बनविलेली आहे. त्यासाठी त्यांचे देशाच्या सर्वस्तरातून कौतुकही झाले आहे. याच धावपळीत मी  गेली चार वर्ष व्यस्त होते. त्यामुळे संगीताकडे माझे प्रचंड दुर्लक्ष झाले होते. या दोन महिन्यात मात्र मी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी सुमारे तीन तास असा भरगच्च रियाझ करते आहे. यामुळे संगीताचा आनंद तर मिळतोच पण  सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते असे डॉ. नाफडे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन जाहीर करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय हा अत्यंत अनपेक्षित आणि आश्‍चर्यकारक होता. आजार आजवर खूप बघितले. मात्र संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणारा हा पहिलाच आजार बघितला. त्यामुळे सगळेच धास्तावले  होते. तसेच मी आणि माझा परिवारही तणावाखालीच होतो.

मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घ्यायचे ठरवले. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे जरी कॉलेजला सुटी मिळाली होती तरी घरी काम करणार्‍या बाया, कारचा ड्रायव्हर हे सर्वच येणे बंद झाले होते. त्यामुळे घरकामाची जबाबदारीही अंगावर होतीच. मात्र माझे पती रवि नाफडे आणि मुलगा सारंग यांच्या मदतीने घरातली सर्व कामे आम्ही पार पाडायला सुरुवात केली. त्याशिवाय आधी सांगितल्यानुसार रियाझालाही वेळ द्यायला सुरुवात  केली. परिणामी मोकळेपणा असा जाणवलच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी पूर्णतः व्यस्त राहायची लॉकडाऊनमुळे अनेकांना घरात रिकामे बसून नैराश्य आल्याची चर्चा कानावर आली. मला मात्र खूप काही नवीन करता  आले.

याकाळात संगीतातील नवीनवीन प्रयोगांचाही मला इंटरनेटच्या माध्यमातून मागोवा घेता आला. गत 25 वर्षांपासून मी शिक्षकी पेशात आहे. शिक्षणामध्येही अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. या काळात मिळालेला वेळ सत्कारणी लावून मी  या प्रयोगांचाही अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचाही मला खूप फायदा झाला. दुसरे म्हणजे संगीतावर मला विविधांगी लेखन करायचे होते. डोक्यात विचार तर खूप होते. मात्र ते कागदावर उमटत नव्हते. गेल्या दोन महिन्यात एखादे  पुस्तक छापता येईल इतके लिखाण मी करू शकले हा लॉकडाऊनचाच फायदा म्हणावा लागेल. या काळात जरी कॉलेजला सुटी होती तरी विद्यार्थ्यांशी माझा नियमित संपर्क सुरुच होता. सुदैवाने लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच गेल्या  शैक्षणिक सत्राचे सर्वच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले होते. मात्र सरावादरम्यान विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असायच्या. त्या फोनवर, प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोडवणे हेही एक काम सुरु होते.

मला दोन मुले आहेत. थोरला निखिल हा पुण्याला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे. तर धाकटा सारंग हा नागपुरातच इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षाला आहे. लॉकडाऊन सुरु होण्याच्या थोडे दिवस आधी सारंगचा किरकोळ  अपघात होऊन त्याचा उजवा हात थोडा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे या काळात मला सारंगकडेही नीट लक्ष देता आले. दुसरे म्हणजे आईने आपल्याला गाणे शिकवावे ही सारंगची इच्छाही मला या काळात पूर्ण करता आली. त्याला शिकवणे  हा देखील माझ्यासाठी आनंदच होता.

लॉकडाऊनमुळे आलेली एक अडचण मात्र आम्हा सर्वांनाच चांगलीच खटकली. निखिल आता विवाहयोग्य झालेला आहे. त्याच्यासाठी मुली बघणे सुरु होते. शक्यतोवर यावर्षात त्याचे लग्न उरकायचेच असे मी मनाशी ठरविले होते. मात्र या अचनाक आलेल्या परिस्थितीमुळे मुली बघणेच थांबून गेले. आता परिस्थिती केव्हा निवळेल आणि त्यानंतर सर्व गोष्टी कशा जुळून येतील हे सांगता येत नाही. मात्र यंदा घरात सून आणयाची ही मनोमन इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना आहे. लॉकडाऊन आज ना उद्या संपेल मात्र पुढे काय हा प्रश्‍न सध्या सगळ्यांनाच भेडसावतो आहे. त्याचे उत्तर शोधणे सर्वच स्तरावर सुरु आहे. मात्र जी काही परिस्थिती येईल तिच्याशी जुळवून घेत आता पुढची वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वानाच मानसिकता तयार करायला हवी. मी शिक्षण क्षेत्रात आहे. कोरोनामुळे आजवरच्या वर्गखोल्यांच्या शिक्षण पद्धतीत आता बदल होणार आहे. नवी शिक्षण पद्धती कशी असावी यावर तज्ज्ञांचा विचार सुरु आहे. फक्त  तज्ज्ञ काही करतील याची वाट न बघता आपल्या सर्वांनाच पुढे काय याचा विचार करून पुढली कालक्रमणा निश्‍चित करावी लागेल. त्यासाठी आपण सर्वांनीच तयार राहायला हवे असे सूचवत डॉ. तनूजा नाफडे यांनी हा संवाद आटोपता  घेतला.

-अविनाश पाठक