लॉकडाऊन आणि मी - लॉकडाऊनच्या काळात आम्ही सामाजिक दायित्वाचा खारीचा वाटा उचलू शकलोे हे समाधान - अरुणा पुरोहित

May 19,2020

लॉकडाऊन आणि मी

देशात आलेला लॉकडाऊन हा एक अनपेक्षित धक्का होता. आपल्याला त्याची काहीच सवय नव्हती. मात्र यावेळी मी आणि माझे पती सचिन पुरोहित यांनी या संधीचा फायदा घेत मिळालेल्या वेळात समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि या दोन महिन्याच्या काळात आम्ही निश्‍चितच काहीतरी करू शकलो याचे समाधान आहे असे मत नागपुरातील ख्यातनाम उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.अरुणा पुरोहित यांनी व्यक्त केले.

नागपूर इन्फोच्या लॉकडाऊन आणि मी या स्तंभात आज नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी अरुणा पुरोहित यांचेशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अरुणाताई म्हणाल्या की, लॉकडाऊन आला तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मानसिकताच नव्हती. आपली घरी बसायची तयारी नाही, आता व्यवसायातील माणसं आपल्याकडे येणार नाही, आता वेळच वेळ आहे हे कळून  भानावर येता येताच दोन तीन दिवस निघून गेले. त्यानंतर सर्वप्रथम विचार आला तो आमच्या विविध व्यवसायांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा आणि कामगारांचा त्यातील अनेक जण 20-20 वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. त्यांच्या  पालनपोषणाची जबाबदारी सहाजिकच आमच्यावर आहे. त्या सगळ्यांना समजावून आम्ही घरी पाठविले. त्यांच्या चरितार्थाचीही आम्ही तरतूद करून दिली. आमचे वर्धा रोडवर एक हॉटेल आहे. तिथे काही बाहेर गावचे पाहुणे थांबलेले होते.  बाहेरगावची वाहने बंद झाल्यामुळे त्यांना घरी पाठवणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी तिथे काही कामगार ठेवावे लागले. पुढील 15 दिवस हे पाहुणे आमच्या हॉटेलवर होते. तोवर माझ्या कर्मचार्‍यांनी त्यांची चांगली सोय  ठेवली. हे पाहुणे गेल्यावर या कर्मचार्‍यांनाही आम्ही सुटी दिली.

आम्ही अंबाझरी ले-आऊटला राहतो. जवळच पांढराबोडीची वस्ती आहे. आमच्या घरी तिथल्याच बाया कामाला आहेत. त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही त्या वस्तीतील बायकांसाठी काहीतरी करावे असा विचार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  मदतीने आम्ही काही गरीबांना द्यायच्या धान्याच्या कीट्स बोलावल्या. मी 25 कीट्सचा अंदाज बांधून त्याप्रमाणे बोलावले होते. मात्र प्रत्यक्षात 50 च्यावर काम करणार्‍या महिला गोळा झाल्या. शेवटी जवळून धान्य टाकून त्यांची सोय करून  दिली. मात्र या निमित्ताने या सर्व बायकांच्या समस्या मला ऐकता आल्या. एकूणच परिस्थितीची भीषणता मला जाणवली.

दोनच दिवसांनी आमचे खेडे असलेल्या सुराबर्डी येथून काही कुटुंबांकडून निरोप आला. तिथेही परिस्थिती बिघडलेलीच होती. मी घरीच काही कीट्स तयार केल्या आणि सुराबर्डीला पाठवल्या. अजून पाठवाव्या म्हणून निरोप आला. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच मी सचिन आणि काही स्नेहीजनांनी एक अन्नछत्र फाऊंडेशन या नावाने संघटना सुरु केली होती. या संघटनेच्या माध्यमातून मग आम्ही काम सुरु केले. सुरुवातीला आम्ही धान्य, किराणा याच्या किट्स बनवून गरिबांना वाटल्या. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला.

याचदरम्यान हर्षीज नावाची एक मल्टिनॅशनल कंपनी पुढे आली. त्यांनी प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि दीर्घकाळ टिकणारे काही अन्नपदार्थ आणि औषधे आम्हाला उपलब्ध करून दिले. मग त्याचे पॅकेट्स करून आम्ही डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी इत्यादींना देण्यास सुरुवात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही आमच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

राष्ट्रसेविका समितीकडून निरोप आल्यामुळे त्यांच्या एक प्रकल्पाशी आम्ही जुळलो. नागपुरातील मिनीमातानगर येथे महिलांसाठी सॅनिटेरी नॅपकीन, हॅन्डसॅनिटायझर, प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या आणि दीर्घकाळ टिकणार्‍या अन्नपदार्थांचे  पॅकेट्स इतपासून तर कुंकवाची डब्बी, सिंदूर इतपर्यंत सर्व टाकून आम्ही किट्स तयार केल्या. या किट्स मिनीमाता नगर आणि आसपासच्या परिसरात आम्ही वितरीत केल्या. महिलांना ही आमची भेट प्रचंड सुखावून गेली.

शहरात ठिकठिकाणी नागरिकांना क्वारंटाईन केले होते. आमच्याच घराजवळ असलेल्या व्हीएनआयटी परिसरात सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरातील बरेच नागरिक विलगीकरण करून ठेवले होते. त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना  चार महिन्यापासून तो 14 वर्ष पर्यंतच्या मुलांना दुधाची समस्या होती. महापालिका आयुक्तांनी आम्हाला सुचवल्यावर आम्ही याठिकाणी दुधाचीही सोय करून देण्यात यशस्वी ठरलो. याशिवाय त्यांना सोयामिल्कसारखे दुग्धजन्य पदार्थही  दिले. अशाच प्रकारे आम्ही चंद्रपूर येथेही 1200 कीट्स नेऊन दिल्या. तेथेही आमच्या उद्योगाचे काही काम सुरु आहे. तिथल्या लोक प्रतिनिधींच्या मदतीने आम्ही हे काम केले.

चंद्रपुराला जाताना स्थलांतरित मजुरांचे जत्थे बघितले. ते बघून मन विषण्ण झाले. मात्र काही इलाज नव्हता. या मजुरांनाही आम्ही शक्य तेवढ्या दीर्घकाळ टिकणार्‍या अन्नाच्या किट्स दिल्या.

हे सर्व करत असताना घराकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. घरात म्हातारे सासू-सासरे, मी,सचिन आणि एक मुलगा इतका परिवार आहे. त्याशिवाय घरी दोन कुत्रीही आहेत. सध्या कामाला कुणीच नाही. त्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारीही मलाच सांभाळावी लागते. माझा मोठा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे प्रचंड तणाव होता. मात्र कळताक्षणीच आम्ही त्याला न्यूयॉर्कहून पीट्सबर्गला माझ्या भावाकडे स्थानांतरित केले. त्यामुळे टेन्शन कमी झाले.

याच काळात रामाचे नवरात्र आले. आमच्या घरी तो मोठा कुळाचार असतो. मात्र यंदा पुजेला गुरुजी आले नाहीत आणि ब्राह्मण सव्वाषिणला आम्ही बोलावू शकलो नाही. आता हा कुळाचार लॉकडाऊन उठल्यावरच करावा लागेल.

लॉकडाऊनमुळे समस्या खूप आल्या आहेत. विशेषतः कनिष्ठ मध्यमवर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. मात्र या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. अनेकांच्या नोकर्‍या जातील असे बोललो जाते. मात्र यावेळी मोदींचा  मेक इन इंडिया हा नाराच उपयोगाचा ठरेल असे मला वाटते. या निमित्ताने या दरम्यान मी अनेकांशी चर्चा करते आणि अनेकांच्या मनावरची भीती कमी करण्याचा प्रयत्न करते.

या काळात सामाजिक दायित्वाचा फार मोठा नाही. पण खारीचा वाटा आम्ही उचलू शकलो याचे आम्हा उभयतांना समाधान आहे असे सांगून अरुणा पुरोहितांनी हा संवाद आटोपता घेतला.

-अविनाश पाठक