विद्यार्थ्यांच्या आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रीय ओबीसी युवती व विद्यार्थी महासंघाने पुढाकार घेत कुलर सुविधेची मागणी केली.

May 05,2026

नागपूर : राज्यात वाढत्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शासकीय वसतिगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा, अस्वस्थता व विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शासकीय वसतिगृहांवर अवलंबून असून वाढत्या तापमानामुळे त्यांच्या आरोग्यावर तसेच शैक्षणिक वातावरणावर गंभीर परिणाम होत असल्याने वसतिगृहांमध्ये कुलर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी युवती महासंघ व विद्यार्थी महासंघाच्या वतीने करण्यात आली.

या संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, नागपूर येथे निवेदन देऊन विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथील शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व मूलभूत सुविधांच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार कुलरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या काळात वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत असून अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढत असून त्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यपूर्ण व सुसह्य वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे संघटनेच्या माध्यमातून ठणकावून सांगण्यात आले.

सदर निवेदनानंतर प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय वाकुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व मागणीची गंभीर दखल घेत विभागीय स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवती महासंघाच्या नागपूर शहराध्यक्ष सौ. रुतिकाताई डाफ (मसमारे), नागपूर शहर जिल्हाध्यक्ष श्री. निलेश कोढे, विद्यार्थी महासंघाचे श्री. रितेश कडव यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी युवती व विद्यार्थी महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य व शैक्षणिक हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.