जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान : जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज
November 19,2024*जिल्ह्यात 4 हजार 631 मतदान केंद्र*
*45 लाख 25 हजार 997 मतदार बजावणार मतदानाचा हक्क*
*मतदान पथके रवाना, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त*
*217 उमेदवार निवडणूक रिंगणात*
*मतदानाचा हक्क बजावण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन*
नागपूर : जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात उद्या, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 217 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 45 लाख 25 हजार 997 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 29 आक्टोबर ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख होती. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. विशेषतः बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या नागपूरकर मतदारांनी मतदानासाठी नागपूरात येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपलाही सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान साहित्य वाटप केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विचारपूस केली. मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गेल्या एक ते दीड महिन्यात विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनामार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी व्होटेथॅान, मॅरेथॅान, चित्ररथ आदी जनजागृती माध्यमांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली.
*पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध*
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. यात मतदान केंद्राध्यक्ष ५ हजार ५५८, प्रथम मतदान अधिकारी ५ हजार ५५८, इतर मतदान अधिकारी ११ हजार ११६, सुक्ष्म निरीक्षक १६८, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच होम गार्डस ५ हजार ५५८, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी ५ हजार ५५८ एवढे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणार आहेत.
*217 उमेदवार निवडणूक रिंगणात*
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 217 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात काटोल 17, सावनेर 18, हिंगणा 18, उमरेड 11, नागपूर दक्षिण-पश्चिम 12, नागपूर दक्षिण 22, नागपूर पूर्व 17, नागपूर मध्य 20, नागपूर पश्चिम 20, नागपूर उत्तर 26, कामठी 19, रामटेक 17 असे एकूण 217 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
*4 हजार 631 मतदान केंद्र*
जिल्ह्यात सहाय्यकारी मतदान केंद्रांसह 4 हजार 631 मतदान केंद्रे असणार आहेत. यात काटोल 332, सावनेर 370, हिंगणा 476, उमरेड 395, कामठी 530, रामटेक 359, नागपूर दक्षिण-पश्चिम 384, नागपूर दक्षिण 350, नागपूर पूर्व 368, नागपूर मध्य 308, नागपूर पश्चिम 351, नागपूर उत्तर 408 अशी एकूण 4 हजार 631 मतदान केंद्रे असणार आहेत.
*45 लाख 25 हजार 997 मतदार*
काटोल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 367, सावनेर 3 लाख 21 हजार 817, हिंगणा 4 लाख 50 हजार 141, उमरेड 3 लाख 957, नागपूर दक्षिण-पश्चिम 4 लाख 11 हजार 241, नागपूर दक्षिण 3 लाख 94 हजार 425, नागपूर पूर्व 4 लाख 18 हजार 981, नागपूर मध्य 3 लाख 41 हजार 169, नागपूर पश्चिम 3 लाख 88 हजार 353, नागपूर उत्तर 4 लाख 28 हजार 845, कामठी 5 लाख 1 हजार 770, रामटेक 2 लाख 86 हजार 931 असे एकूण 45 लाख 25 हजार 997 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
*सकाळी 7 ते 6 मतदानाची वेळ*
सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानासाठी इपिक व्यतिरिक्त 12 प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात आली आहे.
*विशेष मतदान केंद्रांची निर्मिती*
मतदारांचा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात आदर्श मतदान केंद्र 14, महिला नियंत्रित मतदान केंद्र 13, युवा कर्मचाऱ्यांकडून नियंत्रित 13, दिव्यांग मतदारांकडून नियंत्रित 10 मतदान केंद्रे असणार आहेत.
L