मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छ. संभाजीनगर दौऱ्यावर; जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त

August 02,2024

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये येणार आहेत. महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते सिल्लोडला दुपारी 12 वाजता येतील आणि 4 वाजता परत मुंबईकडे रवाना होतील.

MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री भेटले नाही तर सिल्लोडच्या कार्यक्रमात गोंधळ करू, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री यांनी जलील यांना विमानतळावर 12:30 वाजता भेटण्याची वेळ दिली. आदर्श सहकारी बँकेच्या घोटाळ्यात खातेदारांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी जलील यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. आदर्श ठेवीदारांच्या प्रश्न प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जर भेट दिली नाही तर त्यांचे योग्य ते स्वागत करू, असा इशारा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा वेळ न मिळाल्यास आमचे आदर्श ठेवीदार लाडकी बहीण कार्यक्रमात सहभागी होतील, असं जलील म्हणाले.

कडेकोड बंदोबस्त

मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुख्यमंत्री यांच्यासाठी संभाजीनगर ते सिल्लोडपर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर ते सिल्लोड रोड मार्गाने जाणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांचा ताफा अडवण्याचं आंदोलन होण्याची शक्यता असल्याने हा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे

कार्यक्रमाचा मंडप बेकायदेशीर..

सिल्लोडमध्ये ज्या जागेवर कार्यक्रम होणार आहे ती जागा बळजबरीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप सिल्लोडमधील नागरिकांनी केला आहे. कार्यक्रमाचे आयोजक अब्दुल सत्तार यांनी जागेचा वाद न्यायालयात असतांना कार्यक्रमासाठी त्या जागेवर भव्य मंडप उभा केल्याचा आरोप करण्यात आला आहे