विधान परिषदेत दगा फटका टळण्यासाठी शिंदेंचा मास्टर प्लॅन, या शिलेदारांवर जबाबदारी

July 11,2024

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, निवडणुकीत दगा फटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून खास रणनिती तयार करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार हॉटेल ताज लँडस् एंड हॉटेल मधून एकत्रित बाहेर पडणार आहेत,  हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदार आणि मंत्र्यांची  जबाबदारी मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये तळ ठोकून आहेत. एकाच बसमधून सर्व आमदार आणि मंत्र्यांना विधानभवनात घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीत मतांचं विभाजन आणि फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेकडून रणनिती आखण्यात आली आहे.

दरम्यान त्यापूर्वी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री यांची बांद्रामधील ‘ताज लँड्स एंड’ या हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना काही सूचना दिल्या आहेत. मतांचं विभाजन, दगा फटका आणि युतीचा धर्म या बाबत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये आमदारांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना अंधेरीमधील द ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. द ललितमध्ये बुधवारी रात्री सुनील तटकरे यांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या आमदारांकडून साजरा करण्यात आला आहे. यावेळी तटकरेंकडून जेवणांच आयोजनही करण्यात आल होत. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललित मध्येच बैठक होणार आहे . अनेक आमदार पावसात अडकल्याने उशीरा पोहोचले होते . आज काही आमदारांच्या लक्षवेधी लागलेल्या असल्याने ते रात्रीच ललित मधून बाहेर पडले आहेत.