'वीर सावरकर' दृक-श्राव्य कार्यक्रम 27 मे रोजी : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजन

May 24,2023

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संगीत व नृत्य-नाट्याने बहरलेला 'वीर सावरकर' हा दृक-श्राव्य  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिनांक 27 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले हॉल येथे हा अभूतपूर्व कार्यक्रम पार पडणार आहे. 

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि मैत्री परिवार संस्था, ब्लाईंड रिलीफ असोशिएशन व सुरसंगम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे व अमर कुलकर्णीसह आकांक्षा, अक्षय, अमेय व देविका ही त्यांची चमू गीतमैफिल रंगवणार आहे. तर, वादक अमर शेंडे व महेंद्र ढोले यांच्यासह सुभाष वानखडे, विक्रम जोशी यांच्या अप्रतिम वादनाने कार्यक्रमाला बहार येणार असून नृत्यांगना अवंती काटे यांचा देखील नृत्याविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे संगीत नियोजन सचिन ढोमणे तर नाट्य निवेदन विनय मोडक करणार आहेत. नागपूरकरांसाठी पहिल्यांदाच या आगळ्यावेगळ्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून, वीर सावरकरांना देण्यात येणारी हि सांस्कृतिक मानवंदना ठरणार आहे, अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या आहेत. कार्यक्रमासाठी पासेसची व्यवस्था करण्यात आली असून एका पासवर दोघांना प्रवेश देण्यात येईल. सर्व रसिक श्रोत्यांनी व सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव भा.प्र.से. विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.