नागपूरमध्ये 108 वी 'इंडियन सायन्स काँग्रेस' जानेवारीमध्ये नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

November 22,2022

नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे घेतले जाते. कृषी, वने, प्राणी, मत्स, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान,नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते. यापूर्वी नागपूरमध्ये 1974 साली 61 वी इंडियन सायन्स काँग्रेस झाली होती.


जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक या काळात नागपूर शहरात असणार आहेत. याशिवाय गेल्या काळात महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या प्रमुख संस्था या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. देश विदेशातील वैज्ञानिकांचा समावेश आणि त्यांच्यासोबत विज्ञानात प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संवादही या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. या संमेलनामध्येच राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलन देखील घेण्यात येते. यासाठी किशोर वैज्ञानिकही नागपूर येथे मुक्कामी असतील.

राष्ट्रीय स्तरावरील या संमेलनाच्या आयोजनाबाबत नागपूर जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, नागपूर विद्यापीठ व अन्य प्रमुख संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यामध्ये विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, उपायुक्त आशा पठाण, प्रदीप कुलकर्णी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलीस उपायुक्त एम.सुदर्शन, निरीच्या मुख्य संशोधक पद्मा राव,निरीच्या विज्ञान सचिव डॉ. रिटा दोदाफकर, मनपाचे अभियंता वाईकर, विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी.एस. खाडेकर, राजेश सिंग व अन्य मान्यवर उपस्थित होते