हर घर तिरंग्याला नागपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद शासकीय कार्यालयांवर तिरंगी रोषणाई

August 14,2022

नागपूर, दि. 13 :  शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला जिल्ह्याच्या प्रत्येक घरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अनेक नागरिकांनी सुर्योदयालाच घरावर तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी 5 लाख 31 हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकत असल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. उद्या पर्यंत सर्व ठिकाणी तिरंगा लावण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरांघरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात आज 2 लाख 55 हजार 341 तर शहरी भागात 2 लाख 35 हजार 316 घरांवर तिरंगा लावण्यात आले आहे. शासकीय कार्यालय व दुकाने, शहरी भागात तिरंग्याची संख्या 38 हजार आहे. ग्रामीण भागात ही संख्या 1785 आहे. तथापि ज्या नागरिकांनी झेंडे लावले नसतील त्यांनी उद्या पुन्हा तिरंगा फडकविण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये.  यासाठी आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा, याबाबत ध्वज संहिते माहिती दिली आहे. या ध्वजसंहितेचे सर्व नागरिकांनी पालन करावे, कोणीही प्लॅस्टीक व कागदी झेंडे लावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. उद्या देखील तिरंगा लावला जाऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतेक शासकीय कार्यालयावर तिरंगी रोषणाई करण्यात आली असून स्वराज्य महोत्सवाअंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाची साफसफाई करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयास ध्वजसंहिता नियमाप्रमाणे सकाळी ध्वज फडकावून सध्याकाळी उतरविणे अत्यावश्यक आहे. तथापि घरासाठी ही ध्वजसंहिता लागू राहणार नाही, 13 ऑगस्टला सकाळी झेंडा उभारुन 15 ऑगस्टला सायंकाळी सन्मानाने तो उतरवावा. परंतु ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.

ध्वज (तिरंगा) ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वस्त धान्य दुकान व काही ठिकाणी बचत गटाकडे उपलब्ध आहेत. त्यासोबत प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल. शाळामध्ये एकाच घरातील दोन व जास्त भावंड असल्यास दोघांना मिळून एकच तिरंगा वाटप करण्यात येईल. तसेच यानंतर जे ध्वज शिल्लक राहतील ते ध्वज गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात येईल. या सुविधांचा ग्रामीण भागात लाभ घेण्यात यावा. तसेच आपला तिरंगासोबतचा फोटो नागरिकांनी अपलोड करावा असेही आवाहन करण्यात आले.