हिमाचलमध्ये झालेल्या भूस्खलनात नागपूरच्या तरुणीचा मृत्यू

July 26,2021

नागपूर : २६ जुलै - कोराडीची प्रतीक्षा पाटील हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेली होती. आठ दिवसांत ती सहल आटोपून परतणार होती, मात्र रविवारी झालेल्या दुर्घटनेत तिच्या आयुष्याचाच प्रवास थांबला. त्यामुळे आता तिच्या घरच्यांना तिची कायमच प्रतीक्षा असणार आहे. ती मात्र कधीही परत न येण्यासाठी निघून गेली आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील बटसेरी येथे रविवारी सायंकाळी भूस्खलन होवून त्यात ९ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांत कोराडी येथील प्रतीक्षा सुनील पाटील (वय २७) या तरुणीचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेश प्रशासनाने मृतांच्या आप्तांचा शोध घेऊन त्यांना या अपघाताबाबत कळविले. प्रतीक्षाच्या घरी हे वृत्त कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का मोठा धक्का बसला. ते तर तिच्या परतीची प्रतीक्षा करीत असताना अशी दु:खद वार्ताच त्यांच्या घरी येऊन धडकली. दोन दिवसांपूर्वी प्रतीक्षा ही एका ग्रुपसह हिमाचल प्रदेशच्या सहलीसाठी गेली. गेल्या सव्वा वर्षापासून करोनाच्या लॉकडाउनमुळे बहुतेकजण घरात होते. आता दुसरी लाट ओसरली असल्याने अनेक पर्यटनस्थळे सुरू झाली आहेत. त्यामुळे प्रतीक्षाही दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशच्या सहलीला गेली. मात्र, दोनच दिवसांत काळाने डाव साधला. किन्नौर येथील पोलिस अधीक्षकांनीही नागपूरच्या तरुणीचा भूस्खलनात मृत्यू झाल्याचे 'सांगितले. आयआयटी खडगपूर येथून शिक्षण घेतलेल्या प्रतीक्षाचे कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पाटणसावंगी येथील सद्भावनानगरात राहायचे. प्रतीक्षाजवळ असलेल्या आधार कार्डवर पाटणसावंगी हाच पत्ता आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश प्रशासनाने तिच्या नावापुढे पाटणसावंगी, नागपूर असाच उल्लेख केला आहे. मात्र, काही वर्षांपूर्वीच हे कुटुंब पाटणसावंगीवरून कोराडी येथे वास्तव्याला आले होते. तिच्या आधार कार्डवर मात्र जुनाच पत्ता आहे. तिच्या घरी आई-वडील आणि भाऊ, असा परिवार आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांचे पार्थीव सोमवारी पहाटे चार वाजता दिल्लीतील हिमाचल भवन येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर तिचे पार्थीव नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार असल्याचे किन्नौर येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, तिचे कुटुंबीय पार्थीव स्वीकारण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.