नेहरुंना शांतीदूत बनावं असं वाटत असल्याने देश कमकुवत झाला - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

July 26,2021

मुंबई : २६ जुलै - पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावं असं वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतर जण उपस्थित होते. “अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला तर त्याआधी वाटलं की देशाच्या सुरक्षेबाबत लोकांचं लक्ष खूप कमी आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटयचं की शांतीदूत बनावं, कबूतरं उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षापासून तसाच ठेवला होता. सरकार घाबरायचं पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले पण अटलजींना आपल्या देशातल्या नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांदेखील सांगतो जसा आम्हाल तुमच्यावर विश्वास आहे तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्या सोबत आहे,” असे राज्यपालांनी यावेळी म्हटलं. देशात आपल्याला शांततेचं वातावरण हवं आहे. आपण कोणालाही शत्रू मानत नाही. दुसरीकडे आपल्याला शत्रू माननाऱ्या लोकांनी ४ बाजूंनी आपण घेरले गेलो आहोत असंही राज्यपाल म्हणाले.
“त्रिशूलमध्ये असताना विमानतळ सुरु नसल्याचे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण कालपरवा बातमीतपत्रात पाहिलं की लडाखमध्ये ४ विमानतळं उभी राहत आहे. मला वाटलं की मला पद्मविभूषण मिळत आहे. कारण सीमेवर हे गरजेचं आहे. हे इतकं वर्ष झालं नाही पण आता मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे,” असे राज्यपाल म्हणाले.