लोकसभेत खासदारांची संख्या १००० पर्यंत वाढवण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न - काँग्रेस नेते मनिष तिवारींचा दावा

July 26,2021

नवी दिल्ली : २६ जुलै - लोकसभेत खासदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस नेते  मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या आधी लोकसभेचं संख्याबळ वाढवत १००० किंवा त्यापेक्षा जास्त असावं , असा उल्लेख या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने केल्याचं मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे. असा कोणताही निर्णय  घेण्याआधी लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं असल्याचं मनिष तिवारी यांनी सांगितलं. मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचं संख्याबळ १००० किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसदेचं चेंबर  १००० जण बसू शकतील अशा पद्धतीने बांधलं जात आहे. पण हे करण्याआधी लोकासोबत गंभीरपणे यावर चर्चा झाली  पाहिजे. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सार्वजनिक वाद-विवाद होणं आवश्यक  आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे.  पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य  नाही. सध्या लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. सध्या संसदेची नवी इमारत उभारली जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी डिसेंबर २०२० मध्ये एका मुलाखतीत लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असं म्हटलं होतं.