आज कारगील विजय दिवस - राष्ट्रपती लडाखमध्ये करणार ५२७ दिव्यांचं प्रज्ज्वलन

July 26,2021

नवी दिल्ली : २६ जुलै - भारताने १९९९ साली कारगीलमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून दर वर्षी २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ६० दिवस सुरु असणारं हे भारत पाकिस्तान युद्ध लडाखमधील उंचावरील भागांमध्ये लढण्यात आलेलं. डोंगराळ भागांमध्ये मागील  काही दशकांमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या युद्धांमध्ये कारगील युद्धाचा समावेश होतो. भारताने पाकिस्तानला पराभूत करुन उंच भागांमध्ये पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भूभाग परत मिळवला. आज कारगील विजय दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दारसला भेट देणार असून तेथील स्मृतीस्थळावर ते या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. या ठिकाणी ५२७ दिवे लावून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. तोलोलिंग डोंगराच्या पायथ्याशी हे स्मृतीस्थळ आहे. चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल  युद्धाला आज २२ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या  दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करुन देणारा हा दिवस.  या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता.