राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत

July 26,2021

नवी दिल्ली :  २६ जुलै - काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सोमवारी ट्रॅक्टर चालवत संसद परिसरात दाखल झाले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी  आंदोलनाच्या समर्थनात राहुल गांधी थेट ट्रॅक्टरवरुन संसदेत दाखल झाले. राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसदेच्या गेटवरच  रोखण्यात आला. यावेळी मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. संसदेचं  पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. मात्र काँग्रेससह विरोधकांनी पेगॅसस प्रकरण, कृषी कायद्यांसह विविध मुद्द्यावरुन  सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. यावेळी काँग्रेस खासदारांनी ‘पेगॅसस प्रोजेक्ट’ रिपोर्टवर चर्चा  करण्यासाठी संसदेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. संसदेत कृषी कायद्यांवर चर्चाच होऊ दिली जात  नाही. शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करायलाच हवेत. हे शेतकरी हिताचे नव्हे तर २-३ बड्या उद्योजकांसाठी कायदे  आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह काँग्रेस नेत्यांना  ताब्यात घेतलं. कलम १४४ चं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सुरजेवाला यांच्यासह काँग्रेस नेते  श्रीनिवास बी व्ही आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.