भास्कर जाधवांच्या अरेरावीवर संजय राऊत यांनी टोचले कान

July 26,2021

मुंबई : २६ जुलै - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल  रविवारी चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरामुळे झालेल्या  नुकसानीची पाहणी करतानाच मुख्यमंत्र्यांनी लोकांचं समस्याही ऐकूण घेतल्या. मात्र, या पाहणीवेळी शिवसेनेचे आमदार  भास्कर जाधव यांनी एका महिलेला केलेल्या अरेरावीवरून वादंग निर्माण झालं आहे. भास्कर जाधवांवर टीका होत असून, चिपळूणमध्ये घडलेल्या या प्रकारावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार  संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भास्कर जाधवांचे कान टोचले. चिपळूणमध्ये झालेल्या घटनेबद्दल बोलताना राऊत म्हणाले, भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही; वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश  वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे करत आहे, अशी भूमिका मांडत राऊत यांनी भास्कर  जाधव यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.