भास्कर जाधवांचं वर्तन अत्यंत धक्कादायक - देवेंद्र फडणवीस

July 26,2021

मुंबई : २६ जुलै - मदतीसाठी  आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका  केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे. जाधवांचं हे वर्तन अतिशय धक्कादायक असल्याचं फडणवीस म्हणाले. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी  शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही  सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला  चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच  केलेल्या दमदाटीमुळे चांगलाच संताप सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला जात आहे.