पॉर्न अँप्स, वेबसाईट आणि ओटीटीचा संयुक्त कृती दलातर्फे तपास करा - आशिष शेलार यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

July 26,2021

मुंबई : २६ जुलै - राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट  आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणुकीची अनेक धक्कादायक माहिती  उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त कृती दल नियुक्त करून अधिक तपास करावा, अशी मागणी भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, राज कुंद्रा एका अश्लील अँप्समधून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. होतकरू तरुण-तरुणींचे शोषण करून दबाव  आणून हे व्हिडीओ तयार होतात. अश्लील अँप्स आणि वेबसाईट्समुळे किशोरवयीन मुलांवर विपरित परिणाम होत असून  त्यांना नकारात्मकतेने घेरले आहे.

मोठ्या फिल्म प्रॉडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ  किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात म्हणून सीबीआय, ईडी, आयबी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएचे एक संयुक्त कृतीदल तयार करून अशा सर्व अश्लील अँप्स आणि वेबसाईट्सची झाडाझडती  घेण्यात यावी, असेही शेलार यांनी या पत्रात म्हटले आहे.