मुंडे भगिनी समर्थकांच्या नाराजी-अस्त्राकडे बीडमधील भाजप नेत्यांचे दुर्लक्ष

July 21,2021

बीड: २१ जुलै - मुंडे भगिनी समर्थकांच्या नाराजी नाट्यात बीड जिल्ह्यातील विद्यमान आमदार व काही पदाधिकाऱ्यानी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजपच्या दोन नेत्यांनी स्वतंत्रपणे थेट पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी नागपुरात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही थेट दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचे स्वागत केले. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांना संधी मिळाली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराज समर्थकांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. पक्ष नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पंकजा यांनी समर्थकांना मुंबईत बोलावून समजावले. आपले नेते मोदी, शहा आणि नड्डा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानत नसल्याचेच स्पष्ट केले. प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही मुंडे समर्थकांच्या नाराजी अस्त्राकडे दुर्लक्ष केले. परिणामी, मुंडे समर्थक जिल्ह्यातील विद्यमान तीन आमदारांपैकी एकही आमदार अथवा प्रमुख पदाधिकारी नाराजांच्या बैठकीत दिसला नाही. त्यामुळे मुंडे भगिनींचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात पक्षाच्याच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून काही नेत्यांनी थेट पक्षातील इतर नेत्यांच्या भेटी घेत नव्या वाटा शोधायला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहेत.