लस घेऊन 'बाहुबली' व्हा - पंतप्रधान मोदी

July 19,2021

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी आज सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या  प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर (बाहूवर) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते, तेव्हा तुम्ही 'बाहुबली' बनता. कोरोनाच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल, तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असे मोदी म्हणाले.

कोरोनाने सर्व जगावर आणि मानवजातीवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी  आणि या मुद्यावर प्राथमिकपणे चर्चा करायला हवी. तसेच सर्व सदस्यांकडून यावरील सूचना सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन एकत्रित वाटचाल करु. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्याची  विनंती करतो. पण त्याचसोबत उत्तर देण्यासाठी सरकारला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल, असे मोदी म्हणाले.