आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू मालविका बनसोड अजिंक्य

June 15,2021

नागपूर : १५ जून - आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने दमदार कामगिरीच्या जोरावर आरएसएल लिथुआनियन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा मान प्राप्त केला आहे.

कौनास येथे लिथुआनियन बॅडमिंटन फेडरेशनतर्फे आयोजित या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिसऱ्या मानांकित मालविकाची महिला एकेरीत विजेतेपदासाठी चवथी मानांकित आयर्लंडच्या रशेल डारागविरुद्ध लढत झाली. डावखुऱ्या मालविकाने आक्रमक आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत रशेलला २१-१४, २१-११ अशा गुणांनी मात देत विजेतेपद प्राप्त केले.

अवघ्या २९ मिनिटात अंतिम लढत पार पडली. अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासून सामन्यात मालविकाची पकड मजबूत होती. तत्पूर्वीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात मालविकाने फ्रान्सच्या अन्ना टाट्रानोवालाला २१-१३, २१-१० अशा गुणांनी नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती. तर रशेलने इस्त्रायलच्या केन्सिया पोलिकारपोवाला २३-२१, २१-१७ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.