धक्कादायक बातमी; विश्वनाथन आनंदला हरविण्यासाठी केली ‘चिटिंग’, पाहा काय झाले होते

June 15,2021

चेन्नई: माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला एका चॅरिटी बुद्धिबळ सामन्यात पराभूत करण्यासाठी आपण तज्ज्ञांची आणि कम्प्युटरची मदत घेतल्याची कबुली झेरोधा या कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी दिली. त्याचबरोबर मनोरंजन म्हणून या लढतीकडे बघावे आणि उगाच वेगळा रंग देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. अर्थात, कामथ यांच्या या ‘चिटिंग’चा फटका त्यांच्या कंपनीला बसला असून, सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे

करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी निधी जमविण्याच्या उद्देशाने रविवारी हा चॅरिटी सामना आयोजित करण्यात आला होता. ‘मी बुद्धिबळात विशी सरांना पराभूत केले, असे अनेक जण विचार करीत आहे. हे अगदी हास्यास्पद आहे. हे म्हणजे १०० मीटर शर्यतीत माझ्यासारख्याने उसेन बोल्टला नमविण्यासारखे आहे,’ असे ट्वीट कामथ यांनी केले. ‘खरे तर विश्वनाथन आनंदसह बुद्धिबळ खेळण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा होती. अक्षयपात्रने ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. खरे तर केवळ निधी उभारण्यासाठी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सामना आयोजिक केला होता होता,’ असेही कामथ म्हणाले. अर्थात मी यासाठी तज्ज्ञांची आणि कम्प्युटरची मदत घेतली. खरे तर यामुळे एवढा गोंधळ निर्माण होईल, असे मला वाटलेच नव्हते. मात्र, झाल्याप्रकाराबद्दल मी माफी मागतो, असे ट्वीटही कामथ यांनी केले.

एका प्रसिद्धी व्यक्ती सोबतचा हा निधी जमविण्यासाठीचा सामना होता. खेळाची नैतिकता कायम ठेवून आनंदासाठी घेतलेली ही लढत होती. बोर्डवर जी स्थिती होती, त्यानुसारच मी खेळ केला. प्रत्येकासाठी ती तशीच स्थिती होती, अशी आशा आहे. - विश्वनाथन आनंद हा केवळ निधी जमविण्यासाठीचा सामना होता. मात्र, तरीही माझ्याकडून या सामन्यासाठी कम्प्युटरची मदत घेतल्याची चूक झाली. याबाबत मी साऱ्यांची माफी मागतो. - निखिल कामथ

ही अगदीच दुर्दैवी गोष्ट आहे. कारण हा एक चॅरिटी सामना होता आणि त्यात कोणी कम्प्युटरची मदत घेईल, अशी अपेक्षा नव्हती. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हायला हवे. पण हा सामना निधी जमविण्यासाठीचा होता. त्यांनी केलेल्या चुकीची माफीही मागितली आहे. अर्थात, भविष्यात असे काही होणार नाही, याची नक्कीच काळजी घेतली जाईल. - भरत चौहान, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सचिव