केंद्रानं पुरवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा - सचिन सावंत यांचा आरोप

May 14,2021

मुंबई : १४ मे - काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पंतप्रधान सहाय्यता निधीतून व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.

 मात्र, काही सुटे भाग न आल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पडून होते.

 या मुद्द्यावरून भा.ज.पा. आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेसकडून या एकूणच व्हेंटिलेटर पुरवठा प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

 पीएमकेअर फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे.

औरंगाबादमधील घाटी रुग्णालय आणि नाशिक महानगर पालिकेला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये घोटाळा झाल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळे पीएम केअर फंडातून राज्यभरात पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करा,

अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

बंद व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करावी!

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत असून ते तंत्रज्ञांनाही दुरुस्त करता येत नसल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं.

हे व्हेंटिलेटर्स पूर्णतः निरुपयोगी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला आढळले आहे.

 त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकलेले नाहीत.

हा मोठा घोटाळा असून केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करावी, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 जनतेच्या जिवाशी खेळ नाशिकला दिलेल्या व्हेंटीलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे.