तरुणीची फसवणूक करून अत्याचार केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

May 03,2021

वाशिम : ३ मे - जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सातत्याने सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करत तरुणीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शेख मोहसीन शेख या युवकासह अन्य पाच आरोपींवर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिसोड येथील फिर्यादी मीना (बदललेले नाव) माणुसकी नगरची रहिवासी आहे. तिची आणि आरोपीची सात वर्षांपूर्वी रिसोड शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. तेव्हा पीडित तरुणी तिथे आरोग्य सेविकेचे काम करत होती. आरोपीने त्याच्या जवळच्या नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यावेळी दोघांची ओळख झाली.
आरोपीने पीडितेचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगत त्यानंतर आरोपीने पीडितेला रिसोड शहरातील विविध ठिकाणी नेले. तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने आक्षेप घेतला असताना लग्नाचे आमिष दाखवून तो शारीरिक अत्याचार करत राहिला.
16 एप्रिल 2021 रोजी पीडितेला कोणत्याही प्रकारची माहिती न देता आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. पीडितेने या संबंधी विचारणा केली असता 27 एप्रिल 2021 रोजी रात्री 12.30 वाजता आरोपी पीडितेच्या घरी गेला. माझ्या घरच्या लोकांना तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे सांगून तो बाईकवर बसवून तिला घरी घेऊन गेला.
धक्कादायक म्हणजे आरोपीने परत तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने आरडाओरडा केली असता त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी येऊन “तुझी लायकी आहे का आमच्या घराची सून होण्याची” असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. त्यामुळे जीवाच्या भीतीने तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तक्रार दिली.
यानंतर शेख मोहसीन शेख पाशु, शेख पाशु शेख फरीद, सुलताना बी शेख पाशु, इलियाज शेख पाशु, नगमा बी शेख पाशु, उजमा बी शेख पाशु यांच्या विरोधात विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 376, 504, 506, 34 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मुंढे करत आहेत.