निवडणूक आयोगाने भाजप प्रवक्त्यासारखे काम केले - ममता बॅनर्जी यांचा आरोप

May 03,2021

कोलकाता : ३ मे - पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल  जाहीर झाले. यात लक्षवेधी ठरली पश्चिम बंगालची निवडणूक. भाजपा संपूर्ण ताकद पणाला लावल्याने बंगालच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पण मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाला मात देत सलग तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवला. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं. यावेळी आयोग ज्या पद्धतीने वागला, ते सगळं भयंकर होतं,” असं म्हणत ममतांनी टीकास्त्र डागलं.
पश्चिम बंगालमधील निकालानंतर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या,”मला विश्वास होता की आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकू. २२१ जागा जिंकण्याचं आमचं लक्ष्य होतं. पण यावेळी निवडणूक निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागला, ते भयंकर होतं. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं,” असा आरोप ममतांनी केला.
“सुरुवातीपासूनच मी सांगत आले आहे की, आम्ही दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू आणि भाजपाला ७० जागांच्या पुढे जाता येणार नाही. जर निवडणूक आयोगाने त्यांना (भाजपा) मदत केली नसती, तर भाजपाला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन छेडछाड केलेल्या होत्या. आणि असंख्य पोस्टल बॅलेट रद्द करण्यात आले. पण, मी पश्चिम बंगाल माणसांना सलाम करते. त्यांनी फक्त बंगाललाच वाचवलं नाही, तर देशालासुद्धा वाचवलं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.