घ्या समजून राजेहो ...नारायणरावांच्या मृत्यूचे किळसवाणे राजकारण करणारी कथित पुरोगामी गिधाडे

April 30,2021

गेले तीन दिवस संपूर्ण देशात नारायणराव दाभाडकर  यांच्या झालेल्या मृत्यूचा विषय गाजत असून त्यावरून प्रचंड राजकारण होत असलेले दिसून येत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवरून इतके राजकारण केले जावे का? हाच खरा वादाचा मुद्दा झाला आहे. या मुद्द्यावरून देशभरातील कथित पुरोगामी व्यक्तींनी सुरु केलेली कोल्हेकुई हा एकूणच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार  असल्याचे निश्चितच म्हणता येईल. होते आहे ते किती उचित आणि किती अनुचित याचाच विचार  या लेखात आपण करणार आहोत.
प्रस्तुत प्रकरणावर भाष्य करण्यापूर्वी हे प्रकरण नेमके काय आहे हे  जाणून घेणे आवश्यक ठरते. सुमारे चार दिवसांपूर्वी नागपूरात समाजमाध्यमांवर एक पोस्ट व्हायरल झाली. नागपूरच्या भाजपच्या तरुण कार्यकर्त्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य पदाधिकारी शिवानी दाणी - वखरे यांच्या फेसबुक वॉल वरून घेतलेली  ती पोस्ट होती त्यात भाजपच्याच दुसऱ्या एक कार्यकर्त्या आसावरी कोठीवान यांचे वडील नारायणराव दाभाडकर  यांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत माहिती दिली होती. त्याआधी शिवानीने  नारायणराव दाभाडकर  या व्यक्तिमत्वाबद्दलही माहिती दिली होती. मृत्यूचे वेळी ८५ वर्षाचे वय असलेले नारायणराव हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक  होते. संघकार्य करतांना त्यांनी समाजभानही जपले होते कुठेही लहान मुलांचा कार्यक्रम असला  की त्याठिकाणी नारायणराव स्वखर्चाने चॉकलेट आणि पेपरमिंट घेऊन त्या मुलांना वाटायचे परिणामी  ते चॉकलेटवाले  आजोबा म्हणून प्रसिद्ध झाले होते  अशी आठवणही शिवानीने त्यात लिहिली होती.
वृद्ध नारायणराव अचानक कोरोना पॉझिटिव्ह झाले त्यांची प्रकृती बिघडली त्यावेळी कुटुंबातील इतरही  कोरोना पॉझिटिव्ह होते.  मात्र त्यांची एक मुलगी आणि जावई यांनी त्यांच्यासाठी कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून प्रचंड धडपड केली  सुमारे चार पाच तासांच्या प्रयत्नानंतर नागपूरच्या गांधीनगर चौकात असलेल्या महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात  त्यांना बेड मिळाला त्याठिकाणी नारायणरावांना ऍडमिट करायला मुलगी आणि जावई घेऊन गेले ऍडमिट केल्यावर  त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली आणि प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले, त्यांची ऑक्सिजन लेव्हल ५५ वर आली होती तरीही डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याचवेळी नरायणरावांना बाहेर एका पेशंटच्या पत्नीचा  रडण्याचा आवाज आला. तो पेशंट जेमतेम चाळीशीचा होता. त्याचीही प्रकृती गंभीर होती आणि त्याच्यासाठी कुठेही बेड  उपलब्ध होत नव्हता. ही परिस्थिती बघून नारायणरावांनी हॉस्पिटलमधून घरी जाण्याचा निर्णय घेतला  त्यांनी सोबतच्या जावयांना सांगितले की आता माझे वय ८५ वर्ष आहे आयुष्यात सर्वकाही मिळाले  आहे, कुठेतरी मरण येणार तर  ते घरी येऊ द्या आज या चाळिशीतल्या व्यक्तीला  बेडची गरज आहे आणि त्याच्या परिवाराला त्याची गरज आहे.  त्यामुळे माझा बेड या रुग्णाला द्या आणि त्याचे प्राण वाचवा असे नारायणरावांनी सोबतच्या जावयांना आणि डॉक्टरांना सांगितले. त्यांचा आग्रह असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि घरी नेल्यावर काही तासांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
हा सर्व घटनाक्रम आपल्या पोस्ट मध्ये विदित करून संघ स्वयंसेवकांची समाजासाठी सर्वस्व झोकून देण्याची त्यागी वृत्ती अशा समर्पणासाठी कारण ठरली अशा आशयाची टिपणी शिवानीने या पोस्टमध्ये केली होती. अपेक्षेप्रमाणे शिवनीची ही  पोस्ट   जबरदस्त व्हायरल झाली. समाजमाध्यमांवर या संदर्भात विविध प्रतिक्रियाही आल्या माध्यमांनीही याची दखल घेतली.  मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रांनी देखील संघस्वयंसेवकाच्या या समर्पण वृत्तीचे कौतुक करणारे ट्विट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही १९२५ साली स्थापन झालेली संघटना आज ९५ वर्षांनंतरही फक्त आपले अस्तित्वच टिकवून आहे असे नाही  तर देशाच्या समाजजीवनातील प्रत्येक क्षेत्रात या संघटनेने आपले स्थान निर्माण केले आहे. विसाच्या शतकाच्या पहिल्या  तीन दशकांमध्ये आपल्या देशात विविध विचारधारांना बांधील असलेल्या संघटनांचे काम सुरु झाले त्यात जसा संघ होता  तसाच काँग्रेसही होता, समाजवादी, साम्यवादी आणि मुस्लिम लीगही त्याच काळात कार्यरत झाली होती. मात्र  आज एकविसाव्या  शतकाच्या प्रारंभी साम्यवादी, समाजवादी आणि मुस्लिम लीग यांचे अस्तित्व शोधावे लागते काँग्रेसचीही घसरण सुरुचं आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज देशाच्या समाजजीवनात प्रत्येक क्षेत्रात पोहोचला आहे. राजकीय क्षेत्रात  संघविचारांशी जवळीक असणारा भारतीय जनता पक्ष आज केंद्रात स्वबळावर सत्ता उपभोगतो आहे आज या देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघेही संघस्वयंसेवक आहेत. याशिवाय जवळजवळ १८ राज्यांमध्ये भाजपची स्वबळावर किंवा मित्रपक्षांसोबत सरकारे बनली आहेत. अजूनही या संघटनेचे विस्तारकार्य  सुरूच आहे संघविरोधकांनी या संघटनेवर आतापर्यंत तीनदा बंदी आणली मात्र तरीही प्रत्येक बंदीनंतर  संघकार्य वाढतेच  राहिले. या बंदिशीवाय संघाला प्रत्येक टप्प्यावर बदनाम करण्याचा प्रयत्न संघविरोधकांकडून झाला २०१४ पर्यंत  या विरोधाला सरकारी पाठबळदेखील होते. तरीही संघ विस्तारताच राहिला आहे.
इतका विरोध असूनही संघ वाढतो याचाच अर्थ संघामध्ये काहीतरी वेगळे आहे जे जनसामान्यांना पटते आहे. संघाने सुरुवातीपासून  राष्ट्रीय एकात्मतेवर आणि एकतेवर भर दिला आहे. त्याचसोबत सामाजिक समरसता आणि सामाजिक बांधिलकीलाही अहम स्थान दिले आहे. त्यामुळे जनमानसाच्या मनात संघाने आपलॆ स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर  संघाने  समाजासाठी सर्वस्व त्यागून देत संपूर्ण आयुष्य संघासाठी वेचणाऱ्या स्वयंसेवकांची फळी  निर्माण केली आहे. गत ९५ वर्षात  हजारो संघ स्वयंसेवकांनी आयुष्य संघाला देत घरदार सोडून कुठेतरी दूर जाऊन आयुष्यभर संघकार्य केले आहे.  अशा निस्वार्थ स्वयंसेवकांच्या जोरावर संघाने आपले स्थान निर्माण केले नारायणराव दाभाडकर हे अशाच निस्वार्थ स्वयंसेवकांपैकी  एक होते त्यामुळेच समाजातील गरजुंसाठी स्वतःचा प्राणही त्यागण्यास ते तयार  झाले.
आज देशाच्या सर्वच क्षेत्रात पोचलेल्या संघाला मी आधी नमूद केल्यानुसार विरोधकही बरेच आहेत शिवानी दाणीची नारायणराव संबंधीची पोस्ट व्हायरल होताच हे संघ विरोधक सक्रिय न होते तरच नवल. या सर्वांना शिवानीच्या  पोस्टमधला संघ स्वयंसेवक एकदमच खुपला त्यांनी लगेचच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यात काही लोकांनी अशी घटना घडलीच नाही  असा दावा केला काहींनी हे संघोट्यांचे (ही संघविरोधकांची संघ स्वयंसेवकांना दिलेली शिवी आहे) कारस्थान असल्याचा  दावा केला काहीही काम  न करता    श्रेयासाठी संघाची धडपड असल्याचीही टीका या मंडळींनी केली    त्यात पुण्याच्या  कुणी शिवरामपंतांनी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला फोन करून असा रुग्ण दाखलच झाला नसल्याचा  दावा करणारी फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. पुरोगामी संघविरोधकांच्या दावणीला बांधलेल्या काही पत्रकारांनीही या प्रकारावर ताशेरे ओढणारे लेख प्रसारित केले.  मात्र राष्ट्रीय स्तरावरील एका इंग्रजी दैनिकाने याची पूर्ण चौकशी केली असता  शिवानीच्या पोस्ट मध्ये तथ्य असल्याचे आढळून आले समाजमाध्यमांवर संघविरोधकांनी  निर्माण केलेल्या  शंकाकुशंकांना संघासामर्थकांनी उत्तरे दिलेली आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील वास्तव आणि नारायणरावांच्या परिवाराची भूमिका या संदर्भात नारायणरावांची मुलगी आसावरी कोठीवान हीचा बाईट माध्यमांनी प्रसारित केला  आणि समाजमाध्यमांवरही तो व्हायरल झाला आहे.  त्यामुळे त्याचा उहापोह मी इथे करणार नाही. मात्र  एकूणच  समोर आलेल्या तथ्यांमुळे संघविरोधकांची ही नसती उठाठेव असल्याचे हळूहळू स्पष्ट होते आहे.
दिसामाजी वाढणाऱ्या संघाला विरोध करण्याची आणि विरोधासाठी बदनामी करण्याची मानसिकता आजची नाही गेली सुमारे  ८० वर्षे तरी हा विरोध सुरूच असल्याचे दिसते मात्र तरीही संघ वाढतॊच आहे हेच या विरोधकांचे  खरे दुःख आहे. काही वर्षांपूर्वी  नागपुरात एका माजी नगरसेवकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदलेली नाही असा शोध लावला होता हा मुद्दा पुढे करत या महाभागाने मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने सांस्था नोंदणी करू  द्या, असा आग्रह धर्मदाय आयुक्तांकडे धरला होता. धर्मदाय आयुक्तांनी ही मागणी फेटाळल्यावर हे सद्गृहस्थ न्यायालयातही गेले  एका भेटीत त्यांनी मला आपली कैफियत ऐकवली त्यावेळी मी त्यांना एकच प्रश्न विचारला, संघाने सर्वस्व त्यागणारे निष्ठावान  कार्यकर्ते घडवले तसे तुम्ही घडवणार आहात  का? तसे घडवणार असाल तर भारतीय समाजजीवनाला नवी दिशा देणारी  आणखी एक संघटना म्हणून भारतीय समाजमनच नव्हे तर संघही तुमचे स्वागत करेल त्याचवेळी संघासारखेच  पुढची शंभर वर्ष झोकून देण्याची तयारी तुम्ही दाखवालं काय? या प्रश्नाला त्या महाभागाजवळ उत्तर नव्हते एखाद्याची  मोठी रेष आपल्याला खटकत असेल तर त्यासाठी आपण आपली त्यापेक्षा मोठी रेषा आखायला हवी असे मी सुचवताच सद्गृहस्थांनी काढता पाय घेतला.  
  या सर्व बाबी लक्षात घेत संघविरोधकांनी पाऊले उचलण्याची खरेतर गरज आहे, मात्र आजवर कोणत्याच प्रयत्नात यश न आल्याने  हे संघविरोधक भांबावल्यागत झाले आहेत आणि त्यातूनच एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा हा दुर्दैवी प्रकार  घडला आहे मरणानंतर वैर संपते असे भारतीय संस्कृती सांगते अफजलखानाचा कोथळा  बाहेर  काढणाऱ्या शिवाजी महाराजांनी  त्याच्या मृत्यूनंतर त्याचे सन्मानाने दफन केले होते. मात्र त्याच शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात   शिवाजींचा वारसा सांगणाऱ्या  कथित पुरोगामी विचारवंतांनी नारायण दाभाडकरांच्या त्यागी मनोवृत्तीच्या  मृत्यूनंतर  त्यावरच  किळसवाणे राजकारण करण्याचा गलिच्छ प्रकार केला आहे. हा सर्व प्रकार बघता हे  सर्वच कथित पुरोगामी विचारवंत  हे मृतदेहांभोवती घिरट्या घालणाऱ्या गिधाडांपेक्षा फारसे वेगळे नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागते अशा नरभक्षक गिधाडांचा बंदोबस्त करणे ही आजची खरी गरज आहे.
या गिधाडांच्या विकृत मानसिकतेवर टीका करतांना ज्या नारायणराव दाभाडकरांनी आयुष्यभर तर समाजाचा विचार केलाच पण मारतानाही त्यांनी स्वतःच्या आयुष्यापेक्षा समाजाच्या गरजेला प्राधान्य दिले त्या एकविसाव्या शतकातील या आधुनिक दधिचीला  माझा मानाचा मुजरा ,  त्यांच्या पुण्यपावन स्मृतीला माझी विनम्र आदरांजली.
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक