गोंदियातील प्राणवायूची समस्या सुटणार, अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून साकारणार प्रकल्प

April 17,2021

गोंदिया: १७ एप्रिल - संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट ओढावले आहे. गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यातच प्राणवायू, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून मेडिकलमध्ये प्राणवायू प्रकल्पासाठी टँक उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या चार,पाच दिवसांत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे गोंदियातील प्राणवायूची समस्या सुटणार आहे.
वैश्विक महामारी बनलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाने शासन, प्रशासनासह जनतेला त्रस्त करून सोडले आहे. यावर उपाय म्हणून सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे.  ही गरज भागविण्यासाठी स्थानिक मेडिकलमध्ये प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
प्राणवायू प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर या कामाला वेग आला आहे. अदानी वीज प्रकल्पाने त्यांच्या सीएसआर निधीतून शासकीय रुग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ते काम जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. येत्या चार ते .पाच दिवसांत सुमारे १३ हजार लिटरचे टँक लावण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्राणवायू सुविधेसाठी उपलब्ध होईल. अशी अपेक्षा अदानी वीज प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने रेमेडसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा काही औषधे विक्रेते गैरफायदा घेत असून, अतिरिक्त दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेता राज्य सभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी अदानी कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी लवकरच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रेमडेसिविरचा साठा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.