कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक अमरावतीत

April 08,2021

अमरावती : ८ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (गुरूवार) केंद्रीय पथक अमरावतीत पोहोचले आहे. डॉ. अमित गुप्ता आणि डॉ. संदीप राय अशी केंद्रीय पथकातील दोन तज्ज्ञांची नावे आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात हे पथक जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी करणार आहे. तसेच, जिल्ह्यातील वास्तविक परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

केंद्रीय पथकातील दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील वास्तविक परिस्थितीची माहिती मिळावी यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, अमरावती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी पांडा यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय पथक दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात ते अमरावती शहर आणि जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉटची पाहणी करणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या, कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या याबाबत संपूर्ण माहिती हे पथक घेणार आहे. यासह जिल्ह्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहेत. औषध साठा, कोरोना लसची परिस्थिती याचाही आढावा हे पथक घेणार आहे.

दरम्यान, केंद्राकडून 30 आरोग्य पथकं राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पथकाकडून 30 जिल्ह्यामधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये लसीकरणाची मोहीम कशाप्रकारे राबविण्यात येते आहे? कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यावर आळा बसवण्यासाठी केलेल्या उपाय योजना याबद्दल माहिती घेतली जाणार आहे. केंद्राने दिलेल्या गाईड लाईन्स राज्यसरकार पाळत आहे का नाही? याची देखील पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.