तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे - चंद्रकांत पाटील

April 08,2021

मुंबई : ८ एप्रिल - प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरलं जाणार असेल तर मग राज्य केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडी प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रालाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येईल असा दावा केला.

“मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. अगदी १८ महिन्यांपूर्वीच्या सरकार स्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस निराशेकडे गेला आहे असं ते म्हणाले. “सचिन वाझे ‘वसूली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढं ते प्रेम वाझेंवर…एक मिनिट विधानसभेचा जाणं म्हणजे काही लाखो, करोडो रुपयांचं नुकसान,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान एनआयए कोठडीत मी सचिन वाझे यांची भेट घेतल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यालाही अनिल परब कसे सहभागी आहेत याची माहिती असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.