रणजीत सफेलकरला १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

April 08,2021

नागपूर ८ एप्रिल  -  मनीष श्रीवास हत्याकांडातील आरोपी कुख्यात रंजित सफेलकरचा पोलिस रिमांडचा कालावधी बुधवारी संपला. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडीचा कालावधी वाढवून मागण्यात आला. न्यायालयाने आता त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मनीष श्रीवास हत्याकांडात सहभागी रंजित सफेलकरचे साथीदार भरत हाटे, शरद उर्फ कालू हाटे व हेमंत गोरखा यांचा पीसीआर संपल्यामुळे या तिघांना मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. रंजित सफेलकरला अटक झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शिवाय आता त्याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठीही लोक पुढे येत आहे. 

शहरातील बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडाचा मास्टरमाईंड देखील रंजित सफेलकर हाच होता. शिवाय नागपूर आणि कामठीतील अनेकांची जमीन आणि प्लॉटवर त्याने अवैधरित्या कब्जा केला आहे. त्याची दहशत असल्यामुळे आजवर कुणीही आवाज उठविला नाही. आता पीडित नागरिक पुढे येत आहे. दरम्यान, निमगडे हत्याकांडात रंजितने ५ कोटींची सुपारी घेतली होती. सुपारी देणारा कोण होता, ही बाब मात्र अद्यापही पुढे आलेली नाही. शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निमगडे हत्याकांडात रंजित सफेलकर यांच्यासह १४ आरोपींना जेरबंद केले आहे. सध्या मनीष श्रीवास हत्याकांडात रंजित सफेलकर पोलिस कोठडीत आहे. तर त्याचे साथीदार जेलमध्ये आहे.

४ मार्च २0१२ रोजी एका युवतीचे लालच देऊन आरेापी रंजितने आपल्या साथीदारांच्या मदतीने मनीष श्रीवासचे अपहरण केले होते. त्याला पवनगाव (धारगाव) येथे नेऊन एका खोलीत गळा चिरून त्याची हत्या केली होती. नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून फेकून देण्यात आले होते. पोलिस या प्रकरणात पुरावे गोळा करीत आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.