चिमूर वनपरिक्षेत्रात जंगलाला लागली आग, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

April 07,2021

चंद्रपूर : ७ एप्रिल - चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत मुरपार गावालगत जंगलात आग लागल्याने लाखों रुपयांची वनसंपदा जळुन खाक झाली आहे. या आगीमुळे गावालासुद्धा धोका असल्याचे स्पष्ट झाले. सध्या जंगलात आगीने थैमान घातले आहे. वारंवार आग लागत असल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या परिसरात वाघ, बिबट,अस्वल, ससा, हरीण आदी वन्यजीवांचा वावर असतो. त्याच बरोबर खोडदा नाल्याजवळील जंगल परिसरात आगीने तांडव सुरू केल्याने जंगलाला धोका निर्माण झाला आहे. 

सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्याचबरोबर मोह फुल व तेंदूपत्ता चा हंगाम सुरू झाला आहे. याच कारणामुळे जंगलात आग लागली असावी अशी शंका पर्यावरण प्रेमी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या आगीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्याच्या काही अंतरावर वनविभागाचे रोपवन आहे. या आगीची झळ रोपवनालासुद्धा पोहचली आहे. जंगलातील आग अजुनही धगधगत असल्याने चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वनविभागाच्या कर्मचारी यांनी रात्री  गस्त करून आगीची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करीत आहेत.