बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला शासन सर्वतोपरी मदत करेल - उद्धव ठाकरे

April 07,2021

नागपूर : ७ एप्रिल - नागपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या  आणि अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा खाजगी भागीदारीतून विकास करण्यासाठी नवीन संस्थेची निवड करावी, तसेच मुख्य सचिवांनी याबाबत आढावा बैठक घ्यावी, या उद्यानातील विकास कामांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या कामाची प्रगती तसेच वन विकास महामंडळाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत नुकताच घेतला. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. उद्यानात विकासाला खूप वाव असून, ते भविष्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र होऊ शकते. यादृष्टीने त्यात आणखी सुधारणा करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळेपण दाखविणाèया गोष्टींचा अंतर्भाव करावा. हे उद्यान पाहून तेथे कायम हिरवळ असायला हवी व उद्यानात प्राणी, पक्षी, विविध प्रजातींची झाडे, शोभिवंत झाडे, फुले यांचा समावेश असावा अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. वन विकास महामंडळ सध्या गोल लाकूड विक्री करीत आहे. त्याऐवजी बाजारात लागणारे चिराण आकाराचे लाकूड तयार करून जनसामान्यांना चांगले दर्जेदार व स्वस्त दरात लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आलाप येथे वन विभागाची आरागिरणी वन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.