नियमावलीच्या संभ्रमामुळे व्यापाऱ्यात संताप

April 07,2021

भंडारा : ७ एप्रिल - राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत खडक निर्बंध लावण्याचे घोषित केले मात्र ही लावताना जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने वगळता सर्व दुकाने बंद करावी असा आदेश काढला. मंगळवार तशीही दुकाने बंद होती मात्र आज किराणा, भाजी, डेअरी वगळता बाकी सर्व बंद ठेवण्याची वेळ आल्याने संतापलेले व्यापारी रस्त्यावर उतरले.संपूर्ण टाळेबंदी न करता कडक निर्बंध लावून कोरोना संक्रमण थांबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात नियमावली काढताना जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहील असे फर्मान काढले. जीवनावश्यक वस्तू मध्ये भाजी, किराणा, डेअरी, औषधाची दुकाने यांचा समावेश होतो.

 त्यामुळे आज आज मंगळवार नंतर बाजारपेठ सुरू झाली तेव्हा ही प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व बंद राहतील अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने व्यापारी संतापले. आज शहरात अर्धी दुकाने सुरू आणि अर्धे बंद असे चित्र होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी गांधी चौकात निषेध नोंदविला. त्या ठिकाणी काही काळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्याशी चर्चा केली तेथे समाधान न झाल्याने व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर आपला मोर्चा नेला. कोणत्या ठिकाणी तोडगा निघाला नसल्याचे समजते. त्यामुळे आता व्यापारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक महिना व्यापार बंद राहणार या विचाराने लहान-मोठे व्यवसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.