परिचारिका व विद्यार्थिनीवर अत्याचार करणारे आरोपी गजाआड

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - एका खाजगी रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पहिली घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित 37 वर्षीय परिचारिका ही एका खाजगी दवाखान्यात वरिष्ठ परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्याच दवाखान्यात आरोपी अमरदीप क्रिष्णाजी मंडपे (40) हा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. 

ऑक्टोबर 2020 मध्ये कोव्हिड काळात सदर परिचारिकेची कोव्हिड सेंटरमध्ये ड्युटी लागली होती. कोव्हिडची लागन झालेल्या रूग्णांच्या घरी जाऊन ती त्यांची तपासणी करीत असे. एकाच दवाखान्यात काम करीत असल्याने तिची अमरदीपसोबत ओळख होती. परिचारिका ही एकटी असल्यास तो अश्लिल चाळे करीत असे. दरम्यान, एकदा दवाखान्यात परिचारिकेची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी अमरदीपने तिला एक गोळी दिली होती. गोळी खाताच ती झोपी गेली. ही संधी साधून अमरदीपने तिचे अश्लिल छायाचित्र घेतले. 

त्यानंतर अश्लिल छायाचित्र परिचारिकेला दाखवून तो शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. परंतु, परिचारिका त्याला नकार देत होती. त्यामुळे त्याने ती छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे परिचारिकेच्या पतीला आणि दवाखान्यातील कर्मचार्यांना छायाचित्रे दाखविण्याची धमकी दिली. त्यामुळे परिचारिका घाबरली आणि अमरदीप जसे म्हणेल त्याप्रमाणे ती वागत होती. अमरदीप तिला दवाखान्यातील डॉक्टर क्वॉर्टरमध्ये घेऊन जायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. दिवसेंदिवस त्याची मागणी वाढल्याने ती त्रस्त झाली होती. ती त्याला स्पष्टपणे नकार देत होती. त्यामुळे त्याने तिची अश्लिल छायाचित्रे व्हॉट्अॅ पवर अपलोड केली. याप्रकरणी परिचारिकेच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अमरदीपला अटक केली.

एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बादल प्रमोद गोस्वामी (21) अमरनगर यास अटक केली.पीडित मुलगी ही अकराव्या वर्गात शिकते. फेसबुकवर तिची बादलसोबत ओळख झाली. बादलने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. बालद हा वस्तीतच राहत असल्याने तिने त्याची रिक्वेस्ट मान्य केली. अधूनमधून ते व्हॉट्सअॅमपवर चॅटींग करीत असत. ऐके दिवशी बादलने तिला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला धमकी देऊन वाटेल तेव्हा बोलवित असे. काल रात्रीही बादलने तिला आपल्या घरी बोलविले होते. इकडे मुलगी बिछान्यावर नसल्याने तिच्या आईवडिलांनी शोध घेतला. त्यावेळी ती बादलच्या घरून निघताना दिसली. आईवडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून बादलला अटक केली.