महिलांना संसद आणि विधिमंडळात ५० टक्के आरक्षण द्या - शिवसेनेची मागणी

March 08,2021

नवी दिल्ली : ८ मार्च - शिवसेनेने महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ही मागणी केली आहे. राज्यसभेत महिला दिनानिमित्त विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत ही मागणी केली. 24 वर्षांपूर्वी आम्ही महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, आता महिलांची लोकसंख्या 50 टक्के झाली आहे. त्यामुळे महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्यात यावे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. कोविडच्या काळात त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर झाला आहे. त्यामुळे संसदेत या सर्व विषयांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपच्या खासदार सोनल मानसिंह यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. तसा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसही साजरा केला जावा, अशी मागणी केली. यावेळी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानांना उजाळा देणारा हा आजचा दिवस आहे. तसेच महिलांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचाही हा दिवस आहे, असं नायडू म्हणाले. यावेळी सरोज पांडे आणि फौजिया खान यांनीही महिलांच्या समस्यांवर राज्यसभेचं लक्ष वेधलं.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. महिला इतिहास आणि भविष्य घडविण्यात सक्षम असल्याचं त्यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. महिला इतिहास घडवू शकतात. कुणाला हे रोखण्याची परवानगी देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.