राफेल कंपनीच्या मालकाचा अपघाती मृत्यू

March 08,2021

पॅरिस : ८ मार्च - फ्रान्समधील अब्जाधीश आणि राफेल लढाऊ विमान  बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ  यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू   झाला आहे. ते फ्रान्सच्या संसदेचे सदस्यही होते. भारतासोबत झालेल्या राफेल करारामध्ये त्यांची मोठी भूमिका होती.

ओलिवियर दसॉ सुट्टीवर होते. त्यावेळी त्यांच्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला. फ्रान्सचे अध्यक्ष  इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'ओलिवियर यांचं फ्रान्सवर प्रेम होतं. त्यांनी उद्योगपती, स्थानिक लोकनियुक्त अधिकारी, कायद्याचे निर्माते, वायू सेनेचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्यांच्या अचानक निधानामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या प्रिय व्यक्ती आणि परिवाराच्या बद्दल मी संवेदना व्यक्त करतो.’ असं ट्विट मॅक्रॉन यांनी केले आहे.

ओलिवियर दसॉ हे 69 वर्षांचे होते. फ्रान्सचे उद्योगपती आणि अब्जाधीश सर्ज दसॉ हे त्यांचे वडील होते. त्यांची कंपनीच्या मार्फत राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात येते. फ्रान्सच्या संसदेचे सदस्य झाल्यानंतर कोणताही राजकीय आणि हितसंबंधाचा वाद टाळण्यासाठी त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

फोर्ब्सने 2020 साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी केली होता. त्यामध्ये ते त्यांचे दोन भाऊ आणि बहिणीसह 361 व्या क्रमांकावर होते. त्यांची संपत्ती ही जवळपास 7.3 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. या अपघातामध्ये ओलिवियर यांच्यासह त्यांच्या पायलटचाही मृत्यू झाला आहे.

ओलिवियर यांचे आजोबा मार्सेल हे एक विमान इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये फ्रान्ससाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले होते. त्यांनी या महायुद्धाच्या काळात फ्रान्स विमानामध्ये वारले जाणारे प्रोपेलर तयार केले होते. जे आजही जगप्रसिद्ध आहे.