१७ वर्षीय विद्यार्थ्याने गोळ्या झाडून घेतला शिक्षकावर सूड

March 08,2021

लखनौ : ८ मार्च - उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे एक प्रसंग घडला. वर्गात सर्वांसमोर रागवल्यामुळे अपमान झाल्याने १७ वर्षीय मुलाने शिक्षकाविरोधात सूड उगवण्याची योजना आखली. सचिन त्यागी हे वाणिज्य शिक्षक सरस्वती विहार येथील कृष्णा विद्या स्कूल येथून मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी रागाने भरल्याने या विद्यार्थ्याने त्याच्या तीन मित्रांसह शाळेच्या आवारात त्यागींवर गोळ्या झाडल्या.

ग्रामीण पोलिस अधीक्षक इरज राजा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या तीन साथीदारांसह शिक्षकावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते शिक्षक जखमी झाले. गोळी त्यांच्या खांद्याला घासून गेली. राजा म्हणाले की, चारही तरुणांना आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने ओळखले आहे.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, तर त्यांचे मोबाइल फोनवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसपी यांनी दिली. विद्यार्थ्यांविरोधात शिक्षकाने एफआयआर दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.