जागतिक स्तरावर मान्यता मिळविताना ‘धर्मनिरपेक्षते’चा सर्वाधिक अडसर - योगी आदित्यनाथ

March 08,2021

नवी दिल्ली : ८ मार्च - भारतीय परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळविताना ‘धर्मनिरपेक्षते’चा सर्वाधिक अडसर निर्माण होत असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे. देशहिताशी प्रतारणा करून चुकीचा प्रसार करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

‘ग्लोबल एन्सायक्लोपेडिया ऑफ रामायणा’ या ई-पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे विमोचन शनिवार आदित्यनाथ यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अयोध्या रिसर्च इन्स्टिटय़ूटने हा उपक्रम हाती घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राममंदिराची उभारणी सुरू असताना हा कोश प्रकाशित होणे, याला विशेष महत्त्व आहे. आपण कंबोडियातील व्ॉट मंदिरात भेट दिली असता तेथील बौद्ध मार्गदर्शकाने आपणास सांगितले की, बौद्ध धर्माचा उगम हिंदू धर्मापासून झाला असावा अशी आपणास खात्री वाटते. रामायण- महाभारतातून आपणास केवळ जीवनाचे  तत्त्वज्ञान सांगितले जात नाही, तर भारतीय सीमांच्या विस्ताराची माहितीही मिळते. पाकिस्तान हा १९४७ पूर्वी  भारताचा भाग होता आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानेही आपल्या बंधुच्या पुत्रास ‘पाकिस्तान’चा राजा बनवून सीमांचा विस्तार केला होता, असे ते म्हणाले.