तामिळनाडूत रालोआ आघाडीचे सरकार स्थापन होईल - अमित शाह

March 08,2021

नवी दिल्ली : ८ मार्च - तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीतून राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला. अखिल भारतीय अण्णा द्रमुक- भाजप- पीएमके युतीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

तमिळनाडूत दिवसभर केलेल्या दौऱ्यात रालोआच्या बाजूने जनमत असल्याचे आपल्याला दिसून आले, असे शहा यांनी म्हटले आहे. कन्याकुमारी येथे माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांच्या प्रचारासाठी शहा आले होते. तेथे ६ एप्रिल रोजी लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. किनारपट्टी भागातील सुचिंद्रम येथे आपण ११ कुटुंबांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदश पोहोचवला, असे शहा यांनी सांगितले. भाजपचे कमळ हे निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मोहीम सुरू केली आहे. लोकांनी राधाकृष्णन यांनाच मते द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

शहा यांचा हा केरळ आणि तमिळनाडू दौरा होता. त्यांनी केरळमध्ये थिरुवनंतपूरम येथे राज्य भाजपच्या विजय यात्रेच्या सांगता समारंभात भाग घेतला.