जुने वाहन भंगार करून नवे वाहन खरेदी केले तर ५ टक्के सूट - नितीन गडकरी

March 08,2021

नवी दिल्ली : ८ मार्च - स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत जर तुम्ही जुने वाहन स्क्रॅप (भंगार) केल्यानंतर कोणतेही नवीन वाहन खरेदी केले, तर तुम्हाला 5 टक्केची सूट दिली जाईल. याबाबतची घोषणा स्वत: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, जुन्या वाहनांना भंगार करण्याच्या बदल्यात वाहन कंपन्या ग्राहकांना नव्या वाहनाच्या खरेदीवर सुमारे पाच टक्के सूट देतात. स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा 2021-22 च्या केंद्रीय बजेटमध्ये करण्यात आली आहे. या पॉलिसीमध्ये 4 फेज असतील, ज्यापैकी एका फेजमध्ये सूटबाबत उल्लेख आहे.

पॉलिसीच्या अंतर्गत जुन्या वाहनांना फिटनेस टेस्टमधूनसुद्धा जावे लागेल. फिटनेस टेस्टसाठी सुमारे 40,000 रुपयांपर्यंतचा खर्च येईल, जो रोड टॅक्स आणि ग्रीन टॅक्सशिवाय असेल. हे फिटनेस सर्टिफिकेट केवळ 5 वर्षांसाठी मान्य असेल. तुमचे जुने वाहन फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच त्यास रस्त्यावर धावण्यास परवानगी असेल. जर वाहन टेस्टमध्ये फेल झाले तर त्यास रजिस्टर केले जाणार नाही आणि ते स्क्रॅप (भंगार)मध्ये पाठवण्याशिवाय इतर पर्याय नसेल.