हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड ११ जणांना घेतले ताब्यात

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - जीम प्रक्षिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर मानकापूर पोलिसांनी धाड घालून 5 तरुणींसह 11 जणांना ताब्यात घेऊन त्यांची झिंग उतरवली. याप्रकरणी पोलिसांनी साथरोग कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

मानकापूर टपाल कार्यालयामागे राहणार्या अमित भवानीप्रसाद सौंधिया (31) याचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीला त्याने आपल्या मित्र आणि मैत्रिणींना बोलविले होते. त्यानुसार 5 मित्र आणि मैत्रिणी पार्टीला गेल्या होत्या. पार्टीत सर्वांनी दारू ढोसली होती. काहीजण हुक्का पीत होते. त्याचप्रमाणे पार्टीत सहभागी झालेले तरुण तरुणी जोरजोरात आरडाओरड करीत होते. कुणीतरी ही माहिती मानकापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पो. नि. वैजयंती मांडवधरे, उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, हे. कॉ. रामेश्वर गिते, शिपाई राजेश वरठी, अमोल लोणकर, दीपक डबरासे, नगमा शेख, कविता दुर्गे, राजेंद्र सेंगर यांनी अमितच्या घरी धाड घातली. धाड पडली त्यावेळी सर्वजन मद्याच्या अंमलाखाली नाचत होते.धाड पडताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी काहीजणांना हुक्का पिताना रंगेहात पकडले. या पार्टीतून पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि हुक्क्याचे साहित्य जप्त केले. 

याप्रकरणी जीम प्रशिक्षक अमित सौंधिया यांच्यासह कबीर शर्मा (22) हुडको कॉलनी जरीपटका, शुभम कमलेश डोंगरे (25) गणपतीनगर, प्रशांत बळीराम उके (35) किर्तीधर सोसायटी गोधनी, साहिल सूरज जनबंधू (बेझनबाग) आणि अभिषेक जितेंद्र सांगोळे (22)लघुवेतन कॉलनी, इंदोरा आणि पाचही तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे.