वाहतूक पोलिसाला कार खाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - अजनी हद्दीत शताब्दी चौकात एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार नेऊन त्याला चिरडण्याचा प्रयत्न करणार्या एका गुंडाला अजनी पोलिसांनी डुग्गीपार (जि. गोंदिया) येथून अटक केली. संदेश सिद्धार्थ भोयर (38) शताब्दीनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

3 मार्च रोजी संदेशने प्रतापनगर चौकातील एका शो रूममधून कार चोरली होती. दुसर्या दिवशी दुपारी त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकार्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर 5 मार्चला लॉ कॉलेज चौकातही एका कारला धडक दिली. कारला क्रमांक नव्हता. त्यामुळे धडक दिल्यानंतर प्रत्येक वेळी तो पळून जायचा. 

शनिवारी सकाळी संदेश हा शताब्दीनगर चौकातून क्रमांक नसलेल्या कारने जात होता. चौकातील सिग्नल तोडून तो रस्त्याच्या मधात उभा झाला. त्यावेळी तेथे असलेल्या नितीन वरठी या वाहतूक शिपायाने त्याला कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यावर संदेशने सरळ नितीनच्या अंगावर कार नेऊन त्याला जखमी केले आणि कारसह पळून गेला. या घटनेमुळे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कारचालकाला पकडण्याचे आदेश दिले. 

अजनी पोलिसांनी शताब्दी चौकातील सीसी फुटेज तपासले असता त्यात तो शताब्दीनगरच्या गल्लीतून आल्याचे तो दिसून आला. पोलिसांनी चौकशी करून संदेशची ओळख पटविली. पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक देखील मिळविला. त्याचे लोकेशन काढले असता तो डुग्गीपार (जि. गोेंदिया) येेथे असल्याचे समजले. लगेच पोलिसांचे पथक डुग्गीपारला रवाना करण्यात आले. पोलिसांनी त्याला पकडून नागपूरला आणले. संदेशच्या विरोधात चोरी, घरफोडी, विनयभंगासह 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.