कापड गोदामाला आग लागून ४ लाखाचे नुकसान

March 08,2021

वर्धा : ८ मार्च - हिंगणघाट शहरातील काळ्या सडकेवरील मानधनिया यांचे कापड गोदामाला आग लागून जवळपास 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून आग लागण्याचे स्पष्ट झाले नाही. 

मानधनिया यांचे शहरातील मेनरोडवरती रेडीमेड कपडा दुकान आहे. माल ठेवण्यासाठी त्यांचे मोहता म्युनिसिपल हायस्कूल परिसरात गोडाऊन आहे. परंतु, त्या गोदामामध्ये इलेक्ट्रिक मीटर नाही. तरीसुद्धा आग लागल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

गोदामाच्या खिडकीलासुद्धा बारीक लोखंडी जाळी लागलेली असल्याने आग कशी लागली असा प्रश्न निर्माण झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी गिरीश गंडाईत हे पथकासह घटनास्थळी पोहवून आग आटोक्यात आणली. यावेळी पोलिस यंत्रणासुद्धा हजर होती.