गुप्तधनाचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या दोन आरोपींना अटक

March 08,2021

चंद्रपूर : ८ मार्च - गुप्तधन काढून देतो असे सांगून ४५ हजारांनी लुबाडणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अजय जोधा पडियाल (वय ४५) व सागर अजय पडियाल (वय २७) दोन्ही रा. इंदिरानगर चंद्रपूर, असे आरोपीचे नाव आहे. 

जिल्ह्य़ातील काही ग्रामीण भागात दोन इसम हे स्वत:ला आयुर्वेदिक डॉक्टर व पूजापाठ करणारे महाराज आहेत असे सांगून आणि आयुर्वेदिक औषधी देण्याचा बहाण्याने घरात प्रवेश करून तुमच्या घरी सोने चांदीचे धन आहे. आणि ते आमच्या महाराजाच्या हाताने विशिष्ट प्रकारची पूजापाठ करून आम्ही तुम्हाला काढून देतो. त्या पूजेकरिता तुम्हाला २ लाख ५0 हजार रु. खर्च आहे. असे सांगूण आरोपी ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात होते.

दि. ६ मार्च रोजी गोंडसावरी ता. जि. चंद्रपूर येथील फिर्यादी रवींद्र यादव पेंन्दोर (वय ३८) यांना गुप्तधन काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून अँडवान्स म्हणून पूजेसाठी ४५ हजार रु. ची मागणी करून आरोपी अजय जोधा पडियाल व सागर अजय पडियाल दोन्ही रा. इंदिरानगर चंद्रपूर यांनी फसवणूक केली. आणखी उर्वरित असलेले २ लाख रुपये रेल्वे पटरी चौक इंदिरानगर चंद्रपूर येथे घेऊन येण्यासाठी सांगितले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि संदीप कापडे यांच्यासह एक पथक तयार करून सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीची विचारपूस करून चौकशी केली असता त्यांनी सदर फिर्यादीची आम्हीच फसवणूक केली अशी कबुली दिल्याने पोलिस स्टेशन मूल येथे अप.क. १११/२0२१ कलम ४२0, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून दोन आरोपींना पोलिस स्टेशन मूल येथे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.